तिकीट अनिश्चित, ‘प्लॅन बी’ सक्रिय; तुमसरात राजकीय हालचालींना वेग नगरसेवक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीला नवीन कलाटणी
Summary
तुमसर : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, अपेक्षेप्रमाणे उमेदवारी न मिळाल्यास पर्यायी मार्ग (‘प्लॅन बी’) स्वीकारण्याची तयारी काही संभाव्य उमेदवारांकडून केली जात असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीच्या उमेदवारीवर अजूनही अंतिम […]
तुमसर : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, अपेक्षेप्रमाणे उमेदवारी न मिळाल्यास पर्यायी मार्ग (‘प्लॅन बी’) स्वीकारण्याची तयारी काही संभाव्य उमेदवारांकडून केली जात असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार गट) युतीच्या उमेदवारीवर अजूनही अंतिम निर्णय न झाल्याने अनेक इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, तुमसर शहरातील एका प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी अलीकडेच महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती मिळते. येथे काही इच्छुक पदाधिकारी, सहकारी आणि माजी नगरसेवकांची चर्चा रंगल्याचे समजते.
‘फिक्सर-फिक्सर’ची चर्चा आणि शहरातील वातावरण तापले
शहरात नगरसेवक पदासाठी काही नावे अनौपचारिकरीत्या पुढे असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी ‘फिक्सर-फिक्सर’ची चर्चा करताच वातावरण अधिकच तापले असून, विरोधकांसह पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे संकेत आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) येथूनही उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहेत. काही इच्छुकांनी आपल्या समर्थकांची गाठीभेटी, डोर-टू-डोर संपर्क आणि संघटनात्मक बैठका वाढवल्या आहेत.
एबी फॉर्म हातात आल्याबरोबर खरे चित्र
तिकीट न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवारी देण्याचा किंवा अन्य पटलावरून निवडणूक लढवण्याचा पर्याय काहींनी खुला ठेवला आहे. मात्र, अंतिम चित्र एबी फॉर्मचे वाटप झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
निर्णयप्रक्रिया लांबत असल्याने अनेक इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. काहींच्या मते, युतीतील अंतर्गत समन्वय, सामाजिक गणित आणि स्थानिक गटबाजीमुळे उमेदवारीत गुंतागुंत वाढली आहे.
तुमसरातील राजकारणात निर्माण झालेली अनिश्चितता
अनेक संभाव्य उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सुरू केली असली तरी अधिकृत उमेदवारीशिवाय त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. पुढील काही दिवसांत युतीचे निर्णयकेंद्र कोणती भूमिका घेते, यावर तुमसर शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
—
