जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट
पुणे, दि. २२ : जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.
आगाखान पॅलेसमधील अनेक दालनांना परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि खासगी सचिव महादेव भाई देसाई यांच्याशी निगडित घटना आणि इतिहास जाणून घेतला. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधी हे सर्व पाहून भारावून गेले होते. अन्य परदेशी प्रतिनिधींनीदेखील येथे छायाचित्रे काढून घेऊन आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक प्रतिनिधींनी आपल्या जवळील मोबाईलमध्ये छायाचित्रण कैद करुन घेतले.
महात्मा गांधी यांच्या वापरातील अनेक वस्तू आणि अनेक प्रसंगाशी निगडित छायाचित्रे येथे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्याचाही आनंद परदेशी पाहुण्यांनी घेतला. या स्मारकाशी संबंधित असलेल्या नीलम महाजन यांनी परदेशी प्रतिनिधींना या ऐतिहासिक वास्तूविषयी संपूर्ण माहिती दिली.
यावेळी कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन परदेशी पाहुण्यांनी अभिवादन केले.