नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जी२० बैठकीनिमित्त नागपूरचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

नागपूर, दि. 24 : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व  प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज […]

नागपूर, दि. 24 : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व  प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका,सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय  ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या. या निमित्ताने दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे.आयोजनाची प्रसिद्धीही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *