जीवित व वित्तहानी टाळण्याला प्राधान्य अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
Summary
नागपूर दि. 01 : अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळे अशा लागोपाठ विविध नैसर्गिक आपत्तींशी तोंड द्यावे लागत असून, त्यामध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य आपत्ती कृती दलासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रणा सुसज्ज राहील, यावर भर देण्यात आला असल्याची माहिती आपत्ती […]

नागपूर दि. 01 : अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळे अशा लागोपाठ विविध नैसर्गिक आपत्तींशी तोंड द्यावे लागत असून, त्यामध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य आपत्ती कृती दलासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रणा सुसज्ज राहील, यावर भर देण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिली.
हिंगणा येथील राज्य राखीव पोलीस दल परिसरातील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कार्यालयात भेट दिली. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. अंबाझरी तलावात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात मॉकड्रीलच्या सादरीकरणाचीसुद्धा श्री. वडेट्टीवार यांनी पाहणी केली.
विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक महेश घुर्ये, समादेशक पंकज डहाणे यांच्यासह उपविभागीय अधिकारी इंदिरा पखाले, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नितेश भांबोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना जीवितहानी होणार नाही, याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यादृष्टीने संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. नागपूर आणि धुळे येथे 2016 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन युनिटची सुरुवात करण्यात आली आहे. हिंगणा येथील कार्यालयामध्ये आज त्याबाबत आवश्यक बाबींचा आढावा घेतला असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर बळकटीकरण करण्यास विभागाचे प्राधान्य असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हा विभाग तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक करण्यात येणार आहे. हे दल अत्याधुनिक झाल्यास नैसर्गिक आपत्तीकाळात प्राण वाचविण्यासाठी मजबूत टीम यशस्वीपणे सामना करू शकते. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्याला सहा बोटी मिळाल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या या दोन्ही दलांच्या सहाय्याने राज्यात नैसर्गिक संकटांना तोंड देणे सोपे होणार असल्याचे श्री. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
अंबाझरी तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांची पाहणीही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.