जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा वाढवून वीज प्रश्नासंबंधी बैठक घेण्यात यावी – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.17, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा वाढवून द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या वीज समस्यांचे निवारण करण्यासाठी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी अशी मागणी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
सोमवार ( दि.17 ) रोजी पालकमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त करून खतांचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्ह्यात खतांचा साठा वाढवुन देण्याची मागणी केली. बैठकीचे प्रास्तविक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले तर बैठकीस रोहयो मंत्री ना. संदीपान भुमरे , महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 14 व्या वित्त आयोगातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. पोलीस दलाला देखील नवीन वाहने देणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी च्या उपाययोजना संबंधी बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायत स्तरावर टेस्टिंग ची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे त्यासोबतच गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्यास गावातील शाळेत उपचाराच्या सुविधा निर्माण करून अलगीकरण / विलगीकरण केले पाहिजे, गावात अंत्य विधी किंवा लग्न समारंभ साठी जर नियमांचे उलंघन होत असेल तर तलाठ्यांनी याचा रिपोर्ट सादर केला पाहिजे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनांचे दखल घेवून याबाबत निश्चित कारवाई करण्यात येईल तसेच जिल्ह्यात निश्चितच खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात येईल व जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री ना. सुभाष देसाई यांनी दिली.(पोलिसयोद्धा न्यूज नेटवर्क सिल्लोड )