औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Summary

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण   औरंगाबाद, दि.17, (जिमाका) :- येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करावे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज […]

  • मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार

  • पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन

  • महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

औरंगाबाद, दि.17, (जिमाका) :- येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत करावे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमात पैठणच्या संतपीठाचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात आले.

 

औरंगाबाद जिल्हा परिषद  इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, खासदार अनिल देसाई, पालकमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदिप जैस्वाल, रमेश बोरनारे, प्रशांत बंब, उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड,  अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ.बा. आ. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे  यांची उपस्थिती होती.

जनहिताच्या कामांत राजकारण आणणार नसून यापुढेही राजकीय मतभेद दूर ठेवून वाटचाल केली जाईल असे स्पष्ट करून श्री.ठाकरे म्हणाले की, जिल्हा परिषद इमारत आकर्षक आणि देखणी झाली पाहिजे याबरोबरच तिच्या सेवेचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे. १८ महिन्याच्या आत ही इमारत पूर्ण झाली पाहिजे या अटींवर इमारत बांधकामासाठी २० कोटी दिले जातील. या इमारतीच्या बांधकामाबरोबरच ती सुंदर होण्यासाठीही प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे ही आमची पूर्वीपासूनच इच्छा आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच या ट्रेनबाबतही आमचा आग्रह होता. राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. तिच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार पूर्ण पाठीशी आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना यावेळी दिली.

याच कार्यक्रमात पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.  मराठवाडा ही संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीत संतपीठ स्थापन होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे गौरवोदगार श्री.ठाकरे यांनी यावेळी काढले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम हे येत्या अठरा महिन्यात पुर्ण होईल, अशी ग्वाही देतानाच  इमारतीच्या पुढील बांधकामासाठी 20 कोटीचा निधी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली.  तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोकणच्या धर्तीवर मदत मिळावी अशी मागणीही  त्यांनी  यावेळी  मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

मराठवाड्यात डीएमआयसी, समृध्दी महामार्ग होत असून  दळणवळणाची साधने व्यापक उपलब्ध झाल्यास मराठवाड्याचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल. ग्रामीण विकासाचा पाया असलेल्या इमारतीचे लोकार्पण होत आहे असे सांगून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, म्हणाले की, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी होऊ शकतो, यासाठी फक्त 38 टक्के जागा द्यावी लागेल. त्यामुळे मुंबई-औरंगाबाद हे अंतर केवळ पावणे दोन तासात पार करणे शक्य होणार आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून कोविड काळातही मोठ्या संकटाला आपण यशस्वीरित्या सामोरे गेलो. मुख्यमंत्र्यांनीच विकासाची धुरा हाती घेतल्याने विकसित प्रदेश म्हणून मराठवाडा लवकरच नावारुपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी वास्तू उभी राहील अशी ग्वाही देत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्र्यांच्या उत्तम नेतृत्वगुणाचे कौतुक देशात होत असून  कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती उत्तम रितीने हाताळल्याबद्दल निती आयोगाने देखील महाराष्ट्राचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे हे सिध्द झा आहे. तसेच जिल्हा परिषदेमध्ये देखील सर्व पदाधिकारी व अधिकारी चांगले काम करत असल्याचे सांगून श्री.थोरात यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक केले.

सिल्लोड नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड आणि व्यापारी महासंघ यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाखाचा धनादेश यावेळी  श्री.ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *