जव्हार अर्बन बँकेच्या नोकरभरतीसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
Summary
मुंबई | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने, भरती प्रक्रियेतील काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी […]
मुंबई | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने, भरती प्रक्रियेतील काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँक प्रशासनाला दिले आहेत.
जव्हार अर्बन बँकेत कनिष्ठ लिपिकाच्या १५ रिक्त पदांसाठी शासनमान्य संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन उमेदवारांनी सेवेत रुजू होण्यास नकार दिला, तर दोन उमेदवारांनी अंतिम निवडीनंतरही कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली असता, त्यामध्येही अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली. परिणामी सध्या बँकेत केवळ ७ कनिष्ठ लिपिक कार्यरत असून, त्यामुळे दैनंदिन कामकाज, ग्राहक सेवा तसेच कर्ज वसुली प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता बँक प्रशासनाने व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात आयोजित बैठकीत बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोकरभरतीसंदर्भातील काही निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली. सध्या लागू असलेल्या शासन नियमानुसार, रिक्त पदांच्या भरतीसाठी अंतिम गुणवत्ता यादीनुसार भरावयाच्या पदांच्या २० टक्के उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करणे बंधनकारक आहे. ही प्रतीक्षा यादी नियुक्ती आदेशाच्या तारखेपासून ३६५ दिवसांसाठी वैध असते.
मात्र, या मर्यादेमुळे बँकेला पुरेसे कर्मचारी मिळण्यात अडचणी येत असल्याने, प्रतीक्षा यादीची मर्यादा २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची विनंती बँकेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचा विचार करता, संबंधित बाबींमध्ये सुधारणा सुचविणारा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, जव्हार अर्बन बँकेचे अध्यक्ष आसिफ लुलानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे, कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक भालेराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
