जवाहरनगर हद्दीत मुरुम माती चोरीचा पर्दाफाश; विना परवाना वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात
भंडारा | प्रतिनिधी
जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत अवैध मुरुम माती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करत मुरुम माफियांना मोठा धक्का दिला आहे. नांदोरा शिवारात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.22 वाजताच्या सुमारास, नांदोरा शिवारात (सुमारे 4 कि.मी. पूर्व) पोलीस गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाल आढळून आली. तपासात ट्रक क्रमांक MH-36-TH-3481 हा विना परवाना मुरुम मातीची वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले. सदर ट्रकचा चालक व मालक राहुल खुशाल टांगले (वय 35, रा. बेला, ता. जि. भंडारा) याने सुमारे 4 ब्रास मुरुम माती (किंमत अंदाजे 16,000 रुपये) चोरी करून ती ट्रकच्या डाळ्यामध्ये भरून अवैधरित्या वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले.
कारवाईदरम्यान सुमारे 40 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि चोरीची मुरुम माती पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून पोलीस ठाणे जवाहरनगर येथे अपराध क्रमांक 13/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(म), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48(7)(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाची करडी नजर असल्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. दोनोडे (मो. 7038524043) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जवाहरनगर पोलिसांची ही कारवाई अवैध मुरुम व रेती माफियांविरोधातील लढ्यात महत्त्वाची मानली जात असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
