जलसंपदा सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर सेवानिवृत्त जलसंपदा मंत्र्यांकडून सचिवांच्या कार्याचा गौरव
Summary
मुंबई, दि. 30 : जलसंपदा विभागातील सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर यांचे विभागातील कार्य हे निश्चितच उल्लेखनीय असून भविष्यातही त्यांच्या कार्यक्षमतेचा उपयोग व मदत विभागाला होईल, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काढले. श्री.घाणेकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभात ते […]
मुंबई, दि. 30 : जलसंपदा विभागातील सचिव (लाक्षेवि) संजय घाणेकर यांचे विभागातील कार्य हे निश्चितच उल्लेखनीय असून भविष्यातही त्यांच्या कार्यक्षमतेचा उपयोग व मदत विभागाला होईल, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काढले.
श्री.घाणेकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विशेष कार्य अधिकारी माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वय) टी.एन. मुंडे, तसेच विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.घाणेकर यांनी कोयना प्रकल्प तसेच कृष्णा पाणी तंटा लवाद या राज्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये जवळपास 18 वर्ष काम केले असून ते पूर्णत्वास नेले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या कार्याचा शासनाला आदर आहे. भविष्यातही त्यांच्या बुद्धिमत्तेचा लाभ विभागाला होईल, अशी अपेक्षा श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या 34 वर्षांच्या सेवेमध्ये काम करताना अत्यंत प्रामाणिकतेने व निष्ठेने शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल श्री.घाणेकर यांनी राज्य शासनाचे व विभागाच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी श्री.गौतम, श्री.कोहिनकर तसेच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी श्री.घाणेकर यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या स्वभावाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.