जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करावे – डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 01 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत असून या योजनेद्वारे गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबधित यंत्रणाना दिले.
आज निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, तहसिलदार शरद घोरपडे, उप अभियंता ए.बी. पाटील, गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, जलजीवन मिशन योजनेतून उपलब्ध होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्याचे काम ग्रामस्थांचे असून त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थिरित्या पार पाडावी. तसेच 15 व्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने नांदुर्डी गावात 44 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नांदुर्डी गावातील नळ पाणीपुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता रक्कम 4 कोटी 93 लक्ष इतकी असून निफाड तालुक्यातील इतर 46 नळ पाणी पुरवठा योजनांची प्रशासकीय मान्यता रक्कम 45 कोटी 17 लक्ष इतकी आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील कोणतेच कुटुंब वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे, असेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे देखील तात्काळ पूर्ण करून अतिवृष्टी बाधितांना वेळेत आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सुचनाही डॉ. भारती पवार यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.