जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अतिवृष्टीग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील साडेसात हजाराचे सानुग्रह वाटप
Summary
अमरावती, दि. 15: गेल्या महिन्यात 18 जुलैला जिल्ह्यातील काही गावात अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतीचे तसेच घरातील वस्तूंचेही नुकसान झाले होते. आपदग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहावे यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात साडेसात सात हजार रुपयांचा सानुग्रह […]
अमरावती, दि. 15: गेल्या महिन्यात 18 जुलैला जिल्ह्यातील काही गावात अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शेतीचे तसेच घरातील वस्तूंचेही नुकसान झाले होते. आपदग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहावे यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात साडेसात सात हजार रुपयांचा सानुग्रह निधीचे धनादेश संबंधितांना सुपूर्द करण्यात आले. जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शिराळा, साऊर व खारतळेगाव येथील ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीचे धनादेश वितरीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती पंयायत समितीच्या सभापती संगीता तायडे, पदाधिकारी अलकाताई देशमुख, जयंत देशमुख, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, नरेंद्र फुलझेले, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे यांच्यासह संबंधित गावाचे ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या महिन्यात 18 जुलैला अमरावती जिल्ह्यात काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. त्यात शिराळा, साऊर व खारतळेगाव या गावांसह इतर लगतच्या गावांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, घरांची पडझड, घरातील कपडे, वस्तू आदींचे नुकसान झाले होते. त्यासंदर्भात तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने देखील आपादग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी म्हणून आपले काम जबाबदारीपूर्वक पूर्ण केले आहे. त्यानुषंगाने शिराळा गावच्या क्षेत्रातील 89 कुटुंबांना, साऊर गावातील 312 व्यक्तींना सानुग्रह निधीचा साडे सात हजार रुपयाचा पहिला टप्पा धनादेशच्या स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. उर्वरित अडीच हजार रुपयाची रक्कमही दुसऱ्या टप्प्यात संबंधितांना वितरीत करण्यात येणार आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या, जनसामान्यांच्या संकटकाळी शासन सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खारतळेगावातील अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू पावलेल्या अनिल आकाराम गुडदे यांच्या वारसांना दोन लक्ष रुपये सानुग्रह निधीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. खारतळेगावातील सहा व्यक्तींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 20 हजार रुपयांचा सानुग्रह निधीचे धनादेश मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच अतिवृष्टीग्रस्तांना साडेसात हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आलेत. यावेळी पुरात वाहून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी त्यांच्या घरी जावून भेट घेऊन सांत्वन केले.
घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीबाबत शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना कपडे, तसेच भांडी, घरगुती वस्तू यांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब पाच हजार रूपये, घरगुती भांडी, वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब पाच हजार रूपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपदग्रस्तांसाठी ही मदत तोकडी पडत असल्यामुळे पालकमंत्र्यांनी मदतीची रक्कम वाढवून देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता, त्यांचा पाठपुराव्यामुळे आणखी पाच हजाराची रक्कम मदत म्हणून वाढविण्यात आली असल्याने हा निधी दहा हजार रुपये झाला आहे. त्यानुषंगाने साडेसात हजार रुपयाचा पहिला टप्पा प्रत्येक आपादग्रस्तांना धनादेशच्या स्वरुपात आज वितरीत होत आहे. उर्वरित अडीच हजाराची रक्कमही पुढच्या टप्प्यात बाधितांना वितरीत करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री. फुलझेले यांनी सांगितले.