छत्रपती नगर तुकुम येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य भजन-कीर्तन सोहळा; दोन दिवस ‘पंढरी’ अवतरली
Summary
चंद्रपूर : छत्रपती नगर, तुकुम परिसरात अवघी पंढरी दुमदुमली असल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम (मोजरी) यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित श्री गुरुदेव महिला व पुरुष भजन मंडळ, कुमरे लेआऊट यांच्या वतीने राष्ट्रसंतांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त […]
चंद्रपूर :
छत्रपती नगर, तुकुम परिसरात अवघी पंढरी दुमदुमली असल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम (मोजरी) यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित श्री गुरुदेव महिला व पुरुष भजन मंडळ, कुमरे लेआऊट यांच्या वतीने राष्ट्रसंतांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य भजन-कीर्तन व सामाजिक उपक्रमांचा सोहळा दि. ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य श्री दादाजी नंदनवार, ह.भ.प. मारोतराव कापटे महाराज (माध्यवर्ती प्रतिनिधी, गुरुकुंज मोजरी आश्रम), मा. सौ. संध्याताई किलनेकर (उपसंचालक, आकाशवाणी चंद्रपूर), माजी नगरसेवक श्री सुरेशभाऊ पचारे, मंडळ अध्यक्ष श्री हरिदासजी कापटे, सचिव श्री प्रकाशजी कासर्लेवार, उपाध्यक्ष श्री मधुकर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. संध्याताई किलनेकर यांनी “फॅशन म्हणजे अंगप्रदर्शन नव्हे, तर सदाचार, सद्गुण आणि चांगल्या विचारांची जोपासना” असा मौलिक संदेश दिला.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सकाळी योग-प्राणायाम वर्ग, ग्राम स्वच्छता अभियान, सुमारे ५० भजन मंडळांचा सहभाग, महिलांचा सन्मान, रोख पारितोषिक व मानचिन्ह वितरण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. गल्लोगल्ली राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची पालखी पदयात्रा काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
ह.भ.प. मारोतराव कापटे महाराज यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात बासरीवादक श्री मधुकर राजूरकर यांनी बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच ह.भ.प. नामदेव गुरनुले महाराज यांनी कीर्तनातून ग्रामगीतेचे महत्त्व प्रभावीपणे सांगितले. काही काळासाठी छत्रपती नगरला जणू पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. प्रस्ताविक सचिव श्री प्रकाशजी कासर्लेवार यांनी केले, तर समारोप व आभार प्रदर्शन अध्यक्ष श्री हरिदासजी कापटे व उपाध्यक्ष श्री मधुकर राजूरकर यांनी केले.
हा सोहळा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
