चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर
Summary
नाशिक, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) : मराठी भाषा ही राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा कणा असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात माध्यमांची भूमिका व आव्हाने अत्यंत महत्त्वाची आहे. माध्यमांमध्ये मराठी भाषेचा शुद्ध, सुबोध, समृद्ध आणि प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने माध्यमे नेहमीच पुढाकार घेत असल्याचा […]
नाशिक, दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) : मराठी भाषा ही राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा कणा असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात माध्यमांची भूमिका व आव्हाने अत्यंत महत्त्वाची आहे. माध्यमांमध्ये मराठी भाषेचा शुद्ध, सुबोध, समृद्ध आणि प्रभावी वापर व्हावा या उद्देशाने माध्यमे नेहमीच पुढाकार घेत असल्याचा सूर आज चौथ्या विश्व मराठी संमेलनात उमटला.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात कालपासून चौथे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. या संमेलनात आज माध्यमातील मराठी भाषा या विषयावर चर्चा झाली.
या परिसंवादात दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, आज तक वाहिनीचे साहिल जोशी, ठाणे वैभवचे मिलिंद बल्लाळ, साम टिव्हीचे नीलेश खरे, झी 24 तासचे कमेलश सुतार व दै. दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत हे सहभागी झाले होते.

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे माध्यमांतील भाषाशैलीत बदल होत आहेत. इंग्रजी व हिंदी शब्दांचा वाढता वापर मराठीच्या अभिव्यक्तीवर परिणाम करत असून माध्यमांनी याबाबत सजग राहण्याची गरज आहे. संपादक, लेखक किंवा संवादक यांच्याकडे भाषेची जाण, संवेदनशीलता आणि मांडणीची शिस्त असणे आवश्यक असते. एखादा संदेश शेवटच्या घटकापर्यंत स्पष्टपणे पोहोचला की त्या कामाचे खरे मूल्य ठरत असते. अंतिम वापरकर्त्याला त्याचा अर्थ समजला, तरच संवाद यशस्वी मानला जातो. त्यामुळे बोध होणारी, समजण्यास सोपी आणि शुद्ध मराठी वापरल्यास समाजाशी प्रभावी संवाद साधता येतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आजच्या काळात एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. माहितीची उपलब्धता वाढली असली तरी वाचकांचा लक्ष केंद्रित ठेवण्याचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे संदेश हा संक्षिप्त, स्पष्ट आणि आकर्षक असणे अधिक गरजेचे आहे. एआय चा उपयोग माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर काम अधिक परिणामकारक करण्यासाठी वापरले पाहिजे असे मत चर्चेतून पुढे आले.
