चन्द्रपुर महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

चंद्रपूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण आणि नुकसान प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कामांचा आराखडा तयार करावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

Summary

मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कामांचा परिपूर्ण आराखडा तयार करा आणि ज्या कामांचा मंत्रालय स्तरावर विविध विभागांशी पाठपुरावा आवश्यक आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री […]

मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कामांचा परिपूर्ण आराखडा तयार करा आणि ज्या कामांचा मंत्रालय स्तरावर विविध विभागांशी पाठपुरावा आवश्यक आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला दिले.

मंत्रालयात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती, त्यामुळे झालेले नुकसान, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मदत कार्य आदींचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव आप्पासाहेब धुळाज, महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो. वळवी, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अ. शं. गाडेगोणे, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याला यावर्षी ईरई नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत करण्याबरोबरच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी तात्काळ करावयाच्या आणि दीर्घ उपाययोजनांबाबत आराखडा आवश्यक आहे.  पूर येण्याची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना विविध पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने याबाबत विविध यंत्रणांची मदत आणि माहिती घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नदीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत, नदीतील गाळ काढणे आणि नदीपात्राची स्वच्छता आवश्यक आहे. याशिवाय, पूर नियंत्रण बॅरेज संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, पूरनियंत्रण रेषेमुळे चंद्रपूर शहराच्या विकासालाही काही प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे पूरनियंत्रण रेषेची वस्तुस्थिती तपासावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पूर नियंत्रण आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीला प्रतिबंध व्हावा, यासाठी नगरविकास, महसूल, मदत व पुनर्वसन, ग्रामविकास आदी विभागांकडे तातडीने परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा आणि या विभागांनी आवश्यक मदत त्यासाठी करावी, असे निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी पूर परिस्थिती आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. वर्धा नदीच्या बॅक वॉटरमुळे शहराला पुराचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ करावयाच्या कामांसाठी मदत व पुनर्वसन विभाकाकडे 50 कोटी रुपयांचा आणि ग्रामविकास विभागाकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *