चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपूर जिल्ह्यातील पिवळा मोझॅकग्रस्त शेतकऱ्यांसाठी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजची विनंती सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पाहणी

Summary

चंद्रपूर, दि. २३ : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटलेल्या शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे […]

चंद्रपूर, दि. २३ : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटलेल्या शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६  हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना, पांढरपौनी, हरदोणा (खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार,  देवराव भोंगळे, सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाईची मिळण्यासाठी विनंती केली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही पत्र पाठविले. मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते. याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रिक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांचे लक्ष वेधले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *