BREAKING NEWS:
महाराष्ट्र सोलापुर हेडलाइन

ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानामुळे गावाचा सर्वांगीण विकास – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Summary

सोलापूर,दि.4 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान खूप महत्वपूर्ण आहे. या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. नियोजन भवन येथे आज जिल्ह्यात ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ आणि अभियान माहिती पुस्तकाचे […]

सोलापूर,दि.4 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान खूप महत्वपूर्ण आहे. या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

नियोजन भवन येथे आज जिल्ह्यात ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ आणि अभियान माहिती पुस्तकाचे अनावरणप्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलते होते. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदी उपस्थित होते.

श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, सीईओ दिलीप स्वामी यांची संकल्पना आदर्शवत असून या अभियानामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे. यासाठीची माहिती पुस्तिका खूप उपयुक्त आहे.

श्री. स्वामी यांनी अभियानाची माहिती दिली. 2 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत हे अभियान सुरू राहणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षमीकरण करणे, ग्रामपंचायतमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा व सेवा, ग्रामपंचायतीच्या योजना लोकाभिमुख करणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविणे, ग्रामसेवक व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे बळकटीकरण करणे, ग्रामस्थांना उत्तम प्रकारे संगणकीकृत सेवा पुरविणे, आपले सरकार सेवा केंद्र पारदर्शक व सक्षम बनविणे, ग्रामपंचायत इमारतीचे सौंदर्यीकरण करणे, ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण व बाग बगीचा करणे, ग्रामपंचायत कारभार जलद करणे, ग्रामपंचायतीचे अभिलेख वर्गीकरण करणे आदी उद्दिष्ट्ये या अभियानाची आहेत.

श्री. शेळकंदे यांनी सांगितले की, सक्षमीकरण, सुशासन, स्वावलंबन, सेवाहमी व सुशोभिकरण या प्रमुख मुद्यांवर जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविणेत येणार आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सायकल बँक उपक्रमातून मुलींना सायकली वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चे नंबर वन फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलींसाठी सुरू केलेल्या सायकल बँक उपक्रमाला 100 सायकली देण्यात आल्या. त्यातील प्राधिनिधीक स्वरूपात 11 सायकलींचे वाटप महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते मुलींना वाटप करण्यात आले.

नियोजन भवन येथे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सायकली प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन श्री. विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेळकांदे, कार्यकारी अभियंता पंडीत भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर बाबर, संजय जावीर, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, मल्हारी बनसोडे, बापूसाहेब जमादार, उत्तम सुर्वे उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन हरिबा सपताळे, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, तज्ज्ञ संचालक डॉ. एस. पी. माने, ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, शहाजहान तांबोळी, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके ,सुहास चेळेकर , अनिल जगताप, शेखर जाधव, सुंदरराव नागटिळक, विष्णू पाटील, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत, सचिव दत्तात्रय देशपांडे उपस्थित होते. आभार धन्यकुमार राठोड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *