BREAKING NEWS:
आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

गोवर संसर्ग : मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Summary

मुंबई, दि. 22 : गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात येईल. दरम्यान, पालकांनी मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. […]

मुंबई, दि. 22 : गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात येईल. दरम्यान, पालकांनी मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तिथेही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार, आरोग्य आयुक्त डॉ तुकाराम मुंढे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मीता वशी, डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, मुंबई शहरातील ठराविक प्रभागातच गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या बालकांना दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. लसीकरणासाठी दररोज १४० आणि अतिरिक्त १५० लसीकरण सत्र आयोजित केली जात आहेत. लसीकरण करुन घेतले जावे यासाठी समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी समाजातील काही प्रभावी व्यक्तिमत्व, धर्मगुरू यांचे सहकार्य घेतले जात आहे.

गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुंबईतील प्रभागात विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षात संपर्क साधल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. काही शंका असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शंका समाधान करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

येत्या काळात गोवरचा संसर्ग असलेल्या प्रभागात अतिरिक्त पथकामार्फत लसीकरण केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर मंत्री डॉ सावंत यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट दिली. त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी डॉ. मंगला गोमारे, अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *