BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

गॅस टंचाईच्या अफवांनी मोहाडी तालुका हादरला! गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा; प्रशासनाचे ‘नो स्टॉक’चे फलक न लावण्याचे आवाहन

Summary

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तालुका पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण ​मोहाडी (भंडारा): इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, या भीतीने मोहाडी तालुक्यातील गॅस ग्राहकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तालुका पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण

​मोहाडी (भंडारा):
इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, या भीतीने मोहाडी तालुक्यातील गॅस ग्राहकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील गॅस एजन्सीसमोर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक ठिकाणी ‘स्टॉक नाही’ असे फलक लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

​पुरवठा साखळीवर युद्धाचा सावट?
​जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. मोहाडी तालुक्यात गॅसची मागणी अचानक वाढल्याने गॅस एजन्सीसमोर मोठी गर्दी होत आहे. पूर्वी गॅस बुकिंग केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिलेंडर मिळत असे, मात्र आता २४ ते २५ दिवसांनंतरही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
​पुरवठा विस्कळीत झाल्याने उडाली तारांबळ
​मोहाडी तालुक्यात प्रमुख तीन गॅस एजन्सी आहेत. दररोज होणारा पुरवठा आता एक दिवसाआड होत असल्याने काही प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. पुरवठा वेळेवर होत नसल्याने एजन्सी मालकांनी ‘स्टॉक नाही’ असे फलक लावले होते, ज्यामुळे लोकांमध्ये अधिकच घबराट पसरली.

​प्रशासनाचा खुलासा: घाबरू नका!
​या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुका पुरवठा अधिकारी पल्लवी मोहाडीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, “तालुक्यात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुरवठा एक दिवसाआड होत असला तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणीही घाबरून न जाता संयम ठेवावा.”
​आकडेवारी काय सांगते? (१२ मार्चची स्थिती):
​निशा गॅस एजन्सी: ३४६ सिलेंडर उपलब्ध, २५० वितरित.
​दत्तप्रभू गॅस एजन्सी: ३४६ सिलेंडर उपलब्ध, १६६ वितरित.

​डोहाळे गॅस एजन्सी: ७१५ सिलेंडर उपलब्ध, ११७ वितरित.
​KYC करणे बंधनकारक
​गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहकांना KYC (Know Your Customer) करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचे ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांचे बुकिंग स्वीकारले जाणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

​वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *