औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

गावाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Summary

छत्रपती संभाजीनगर दि. ६: भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येकाने योगदान दिले तर देशाला विकसित राष्ट्र करणे अवघड नाही. अर्थात त्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेतील प्रत्येकाने आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची […]

छत्रपती संभाजीनगर दि. ६: भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रत्येकाने योगदान दिले तर देशाला विकसित राष्ट्र करणे अवघड नाही. अर्थात त्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेतील प्रत्येकाने आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याची गरज आहे. आपल्या गावाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

वेरूळ येथे आज ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण शिबिराप्रसंगी मंत्री डॉ. कराड बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, ओमप्रकाश रामावत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

कार्यक्रमात संवाद साधतांना मंत्री डॉ. कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत’ याच  हेतूने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

केंद्राच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ आपापल्या गावातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी यांनी योगदान द्यावे. योजनानिहाय प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला घेण्याची गरज असून गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग हा यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो. आरोग्याची सेवा देण्यासाठी जनतेला आयुष्मान भारत कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतात. डीबीटीद्वारे निधी वितरण, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत  असल्याचे मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.

आमदार प्रशांत बंब यांनी विकसीत भारत संकल्पपूर्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने काम करावे, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग यासह इतर सर्व विभागाच्या योजनांची व लाभ पद्धतीची माहिती सादरीकरणात देण्यात आली. यावेळी आमदार श्री. बंब यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या योजनांची माहिती  देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सला भेटी देऊन नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी उपस्थितांनी विकसित भारत संकल्प शपथ घेतली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *