गणेश विर्सजनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांनी केलेल्या तयारीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक उपमुख्यमंत्र्यांनी गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन गणेश भक्तांचे केले स्वागत
Summary
मुंबई, दि. ६: मुंबईसह परिसरात लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीमुळे नागरिकांना आणि गणेश मंडळांना कुठेही अडचण आल्याची तक्रार आली नाही. मुंबई महापालिकेने केलेले अडीचशेहून अधिक कृत्रिम तलावामुळे घरगुती गणेशाच्या विसर्जनाची चांगली सोय झाली. […]

मुंबई, दि. ६: मुंबईसह परिसरात लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीमुळे नागरिकांना आणि गणेश मंडळांना कुठेही अडचण आल्याची तक्रार आली नाही. मुंबई महापालिकेने केलेले अडीचशेहून अधिक कृत्रिम तलावामुळे घरगुती गणेशाच्या विसर्जनाची चांगली सोय झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई पोलिस बजावत असलेल्या कर्तव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गिरगाव चौपाटी येथे भेट देत गणेश भक्तांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शनिवारी रात्री गिरगाव चौपाटी येथे भेट देऊन गणेश मंडळांचे स्वागत केले. याठिकाणी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचे कौतुकही त्यांनी केले. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव विसर्जनासाठी केलेली तयारी अभिनंदनीय असल्याचे सांगत विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यांवर गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षेची काळजी, तसेच नागरिकांना दिलेल्या सुविधा यामुळे हा उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुखकर झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी गिरगाव चौपाटीवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मितीच्या प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित श्री सेवकांशी संवाद साधत त्याचे कौतुक केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून त्यासाठी निस्वार्थ भावनेने सुरू असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी विविध संस्थानी दिलेल्या योगदानाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मुंबई महापालिकेने विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी २७५ हून अधिक कृत्रिम तलाव केले आहेत. त्याचबरोबर जागोजागी स्वच्छता मोहीम आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्याने गणेशाला निरोप देताना नागरिकांना आणि मंडळांना कुठेही गैरसोयीचा समाना करावा लागला नसल्याचे दिसून आले. याबद्दल आयुक्त भूषण गगराणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवत विसर्जन मिरवणुका शांततेने पार पडतील यासाठी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि त्यांच्या टिमने केलेले प्रयत्न नक्कीच अभिनंदनीय असून मुंबईकरांनी गणेशोत्सव दरम्यान दाखवलेली शिस्त आणि पर्यावरणपूरक वर्तणूक प्रशंसनीय असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००