क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

खरबी चेकपोस्ट व गोपेवाडा शिवारात रेतीचोरीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची धडक कारवाई; दोन ट्रकसह 81 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Summary

भंडारा | प्रतिनिधी — जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत, जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत सलग दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, सुमारे 81 लाख 20 हजार रुपयांचा […]

भंडारा | प्रतिनिधी — जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलत, जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत सलग दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, सुमारे 81 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
खरबी चेकपोस्टवर पहिली कारवाई
दि. 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास, खरबी चेकपोस्टजवळ (10 किमी पश्चिम) तपासणीदरम्यान टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एम.पी. 49 बीटी-2112) संशयास्पदरीत्या आढळून आला. चौकशीदरम्यान सदर ट्रकमध्ये अंदाजे 10 ब्रास रेती (किंमत सुमारे 60 हजार रुपये) विनापरवाना वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात ट्रक मालक पवनकुमार येळमाचे (वय 35, रा. मनीवारी, ता. जि. शिवणी, मध्यप्रदेश) यांच्या अपप्रेरणेवरून चालक धिरज कमलाकर ढोबळे (वय अंदाजे 38, रा. नागपूर) याने रेती चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत 40 लाख रुपये किमतीचा ट्रक व 60 हजार रुपये किमतीची रेती, असा एकूण 40 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपेवाडा शिवारात दुसरी धडक
त्याच दिवशी सकाळी 9.25 वाजताच्या सुमारास, गोपेवाडा शिवारात (10 किमी उत्तर) आणखी एका रेतीचोरीचा प्रकार उघडकीस आला. येथेही टाटा कंपनीचा ट्रक विनापरवाना रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. या ट्रकमध्येही अंदाजे 10 ब्रास रेती (किंमत 60 हजार रुपये) भरलेली होती.
या प्रकरणात ट्रक मालक रुपेश प्रभाकर धार्मिक (वय अंदाजे 36, रा. तकिया वार्ड, भंडारा) यांच्या अपप्रेरणेवरून चालक देवगण धनराज कोसरे (वय 35, रा. नेरला, ता. पवनी) याने रेती चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईतही 40 लाख रुपये किमतीचा ट्रक व रेतीसह एकूण 40 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे दाखल, तपास सुरू
या दोन्ही प्रकरणांत संबंधित फिर्यादींच्या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा क्रमांक 451/2025 व 452/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2), 49, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48(7), 48(8) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पो.हवा. शिंगाडे करीत असून, रेतीचोरीमागे आणखी कुणी सहभागी आहे का, तसेच या अवैध वाहतुकीचे जाळे किती व्यापक आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *