खमारी–सुरेवाडा रस्त्यावर रेतीचोरीचा डाव उधळला वैनगंगा नदीतील अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कारधा | प्रतिनिधी — शासनाच्या महसुलावर डल्ला मारत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रेतीचोरीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. खमारी ते सुरेवाडा रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर कारधा पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 वाजताच्या सुमारास, मौजा सुरेवाडा पुन. शेतशिवारात खमारी–सुरेवाडा रोडवर सुमारे 8 किमी उत्तर दिशेला, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथकाने संशयास्पद ट्रॅक्टरची तपासणी केली. तपासणीदरम्यान स्वराज कंपनीचा पांढऱ्या-निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 36 झेड 8509) लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह आढळून आला.
सदर ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक पास, परवाना व रॉयल्टी नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान आरोपीने बेलगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती भरल्याची कबुली दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.
घटनेची माहिती तात्काळ तहसीलदार भंडारा यांना देण्यात आली. तहसीलदारांच्या आदेशानुसार फिर्यादी संदीप काशीनाथराव माकोडे (वय 42, रा. तहसील कार्यालय भंडारा) हे घटनास्थळी दाखल झाले. पंचासमक्ष ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील अंदाजे 1 ब्रास रेती (किंमत सुमारे 6 हजार रुपये) डिटेन करण्यात आली.
या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉली मिळून अंदाजे 7 लाख रुपये आणि रेतीसह एकूण 7 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने अवैधरित्या शासनाच्या मालकीची रेती चोरून वाहतूक केल्याने शासनाचा महसूल बुडवला असून पर्यावरणाचेही गंभीर नुकसान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा क्रमांक 605/2025 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7), 48(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 7 व 9 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. अश्विन भोयर करीत असून, रेतीचोरीमागे आणखी कोण सहभागी आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.
अवैध रेती वाहतुकीविरोधात कारधा पोलिसांची ही कारवाई म्हणजे रेतीमाफियांना दिलेला थेट इशाराच असल्याचे बोलले जात आहे.
संकलन:- न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
