कृषि कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करा – पालकमंत्री दीपक केसरकर।

Summary

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, शेतकऱ्यांना बियाणे आणि […]

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेवर मिळतील अशा दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ताराराणी सभागृहात आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतखाली कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील – यड्रावकर, ऋृतराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र अधिक असून ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. मान्सूनची (संभाव्य ) स्थिती लक्षात घेवून कृषी विभागाने आत्तापासूनच नियोजन करावे . जिल्ह‌्यातील सर्व तालुक्यांना समान पातळीवर खताचे वाटप करण्यात यावे तसेच विविध कंपन्यांच्या बियाणांची गुणवत्ता ( उगवण क्षमता ) तपासून घेण्यात यावी, असे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले.कृषी विभागाने आतापर्यंत समाधानकारक कामकाज केले असल्याचे सांगून त्यांनी या विभागाचे कौतुक केले.

यावेळी विशेषत: युरिया व डीएपी रासायनिक खतांचा पुरवठा दुर्गम भागातील तालुक्यांना पुरेशा व सम प्रमाणात करण्यात यावा, अशी अपेक्षा आमदार राजेश पाटील यांनी केली. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाकडे मंत्रालयस्तरावर पालकमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना खतांचे वाटप वेळेवर आणि समान व्हावे अशी सूचना आ. प्रकाश आवाडे यांनी या बैठकीत केली.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1234 गावे असून 1029 ग्रामपंचायती आहेत .कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 7.76 लाख हेक्टर असून पेरणी लायक क्षेत्र 4.77 लाख हेक्टर इतके असून जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1971 मिलिमीटर असल्याची माहिती श्री.दिवेकर यांनी प्रास्ताविकामध्ये दिली.

प्रारंभी मिलेट – शेतमाल प्रक्रिया केलेली वस्तू व रोप देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दिवेकर यांनी पालकमंत्र्यांचे तसेच इतर मान्यवरांचे स्वागत केले. या आढावा बैठकीसाठी इतर विभागाचे अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते .
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *