BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कौशल्य विकासाबरोबर रोजगार उपलब्धतेला प्राधान्य – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न; पाचवी पासपासून बीई, एमबीए पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी

Summary

मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील राणीबाग मैदानात आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पाचवी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी एक्झिक्युटीव्हच्या कामासाठी ३ हजार पदे उपलब्ध […]

मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाजवळील राणीबाग मैदानात आज झालेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पाचवी पास उमेदवारांसाठी डिलिव्हरी एक्झिक्युटीव्हच्या कामासाठी ३ हजार पदे उपलब्ध करुन देण्यात आली. होमकेअर नर्ससाठी एका कंपनीने २०० पदांसाठी मुलाखती घेतल्या. विविध कंपन्यांनी अशा एकूण ९ हजार २७८ पदांसाठी आज मुलाखती घेतल्या. सकाळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला.

कौशल्य विकास विभागांतर्गत मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. याप्रसंगी माजी नगरसेविका सुरेखा लोखंडे, कौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यात होणार ३०० रोजगार मेळावे

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आमच्या विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुंबईमध्ये मागील ८ दिवसात हा दुसरा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार – मंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, राज्यात उद्योग आणण्याबरोबरच तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. १ लाख ४० हजार नोकऱ्यांसाठी राजभवन येथे विविध कंपन्यांबरोबर नुकतेच सामंजस्य करार करण्यात आले. ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शालेय शिक्षण विभाग पुढाकार घेत आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, एचसीएल, ॲमेझॉनसारख्या नामांकित संस्था, कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात येत आहेत. आपल्या देशात युवक लोकसंख्या अधिक आहे. कुशल माणसाला जगभरात मागणी आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत या कामात व्यापक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ऑफिस बॉयपासून कौन्सेलर पदापर्यंतच्या जागांसाठी मुलाखती

पाचवी पास, दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, डीएड, बीएड पदवीधारक, एमबीए अशा विविध पात्रताधारकांसाठी मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. बीपीओसाठी विविध प्रादेशिक भाषा जाणणारे उमेदवार, बँक जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. घरबसल्या काम करण्यासाठीही रेसिडेन्ट जिओ असोसिएटसारख्या पदांकरिता काही कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.

मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग

एअरटेल, रिलायन्स जिओ, अपोलो होम हेल्थकेअर, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस, टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, कल्पवृक्ष स्टाफींग सोल्युशन्स, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, हिंदू रोजगार डॉट कॉम, पियानो प्रेसिडेल, केव्हीजी स्टाफींग सोल्युशन आदी कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

स्वयंरोजगारविषयक विविध योजनांचे मार्गदर्शन

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *