कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सिटी हायस्कूला दिली भेट
सांगली दि. 30 (जि.मा.का.) : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली येथील सिटी हायस्कूला भेट देऊन संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला व कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, संचालक नितीन खाडीलकर, हरी भिडे, विजय देवधर, केदार खाडिलकर, विपीन कुलकर्णी आदि उपस्थित होते.
सिटी हायस्कूलमध्ये संस्थाचालक यांच्याशी संवाद साधताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगवर भर द्यावा लागेल. शिक्षण संस्थांनी काही कोर्सेस डिझाईन केले पाहिजेत की, जेणकरून भावी पिढी बेरोजगार राहणार नाही. कौशल्यावर आधारित शिक्षण पध्दती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था फार मोठे योगदान देवू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांना एका वेगळ्या दिशेने वाटचाल करावी लागेल.आणि हीच वाटचाल शिक्षण संस्थानाही सक्षम बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
00000