महाराष्ट्र हेडलाइन

कोविड लसीकरण केंद्रांवर नागरिकांना ने-आण करण्यासाठी डॉ. आशिष देशमुख यांनी केली १७ बसेसची व्यवस्था

Summary

प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे “महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे नागपूर जिल्ह्यात कोरोनाने कळस गाठला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत असून मृत्यूचा आकडासुद्धा भयावह आहे. शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षापासून लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर […]

प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
“महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे नागपूर जिल्ह्यात कोरोनाने कळस गाठला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज हजारोंच्या संख्येने वाढत असून मृत्यूचा आकडासुद्धा भयावह आहे. शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षापासून लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथील ऑक्सिजन व इतर सुविधांनी सुसज्जित जवळपास २०० बेड्स कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात २० अत्याधुनिक आयसीयु बेड्सचा समावेश आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची गरज पाहता आम्ही आणखी ३० नवीन बेड उपलब्ध करून देत आहोत. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, अटेंडन्ट व इतर कर्मचारी या कठीण परिस्थितीत आपल्या अमूल्य सेवा रुग्णांना हिमतीने प्रदान करीत आहेत. कोविडग्रस्त रुग्णांना भरती करून उपचाराची विशेष व्यवस्था करण्यात आल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे.
“२९ मे २०२० ला आमच्या व्हीएसपीएमएएचई संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रणजीतबाबू देशमुख यांच्या ७४व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेअंतर्गत कार्यरत एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाला कोविड-१९ साठी ७४ लाख रुपयांची व त्यानंतर पुन्हा ७.३१ लाख रुपयांची अशी एकूण ८१.३१ लाख रुपयांची स्वेच्छेने मदत केली होती. आम्ही सर्वांनी कठीण समयी मोठ्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन कोरोनासंबंधी गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम लता मंगेशकर हॉस्पीटलने कोरोनाग्रस्तांसाठी स्वतः पुढाकार घेतला. आपण नेहमीच शासनाला वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी मदत करू.
“मागील वर्षापासून उद्भवलेल्या या जीवघेण्या कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. वैद्यकीय उपचारासाठी लोकांचे हाल होऊ नये म्हणून लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या माध्यमातून आम्ही विविध गावांमध्ये अनेक रोगनिदान शिबिरे घेतली. रुग्णांना ने-आण करण्यासाठी नि:शुल्क वाहनांची व्यवस्था केली. शिबिरांतर्गत, रुग्णालयाच्या सर्वच ओपीडीमध्ये रुग्णांची नि:शुल्क तपासणी, जनरल वार्डमध्ये भरती रुग्णांचा १००% नि:शुल्क उपचार व ऑपरेशन करण्यात आले. गरजू रुग्णांना याचा फार मोठा फायदा करून देण्यात आला, याचा आम्हाला आनंद आहे. गरजू रुग्णांसाठी ही ‘नि:शुल्क उपचार सेवा’ अजूनही सुरु आहे.
“कोरोनाचा उद्रेक ही गंभीर बाब असून लसीकरण हाच कोरोनापासून बचावाचा एकमेव पर्याय आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा लाभ घ्यावा. कडक उन्हामुळे आणि ग्रामीण भागात वाहन-साधनांचा अभाव असल्यामुळे, गावागावातील नागरिकांना विविध लसीकरण केंद्रांवर ने-आण करण्यासाठी १७ बसेसची व्यवस्था करून देत आहे, जेणेकरून नागरिकांना जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही आणि त्यांचे लसीकरण होईल. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डीस्टन्सिंग आदींचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अत्यावश्यक प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन काटोल-नरखेड क्षेत्राचे माजी आमदार व कॉंग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केले. काटोल-नरखेड तालुक्यातील युवकांनी लसीकरणासाठी जनजागृती करावी व हे क्षेत्र कोरोनामुक्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. आशिष देशमुख यांनी काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रामधील गावागावातील नागरिकांना विविध कोविड लसीकरण केंद्रांवर ने-आण करण्यासाठी १७ बसेसची व्यवस्था केली आहे. या बस-सेवेचा शुभारंभ दि. ०६ एप्रिल २०२१ ला श्री श्रीकांत उंबरकर, उपविभागीय अधिकारी, काटोल यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कार्यालय, काटोल येथे करण्यात आला. यावेळी श्री अजय चरडे तहसीलदार, नरखेड नगराध्यक्ष श्री अभिजितजी गुप्ता व इतर मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *