BREAKING NEWS:
औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे जिल्हा परिषद प्रांगणात नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Summary

औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी […]

औरंगाबाद, दि. 2 (जिमाका) – कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आरोग्य सेवा विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीच्या नऊ रुग्ण्वाहिकांचे लोकार्पण मंत्री श्री. टोपे यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके,जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, शिक्षण व आरोग्य समिती सभापती अविनाश गलांडे पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती मोनाली राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. टोपे म्हणाले, जिल्हा परिषदेला प्राथमिक आरोग्य केंद्रे 51 आहेत. त्यापैकी 48 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्ण्वाहिका देण्याचे शासनाचे नियोजन झालेले आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या बचतीच्या व्याजाच्या रक्कमेतून व आरोग्य विभागाच्या निधीतून पहिल्या 500 रुग्ण्वाहिका राज्यासाठी खरेदी केलेल्या आहेत. आमदार निधीतूनही स्थानिक आमदारांनी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने 102 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकांचा उपयोग गरोदर महिलांना प्रसूती, प्रसूतीनंतर तत्काळ उपचार मिळावा, या उद्देशाने प्रत्येक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका देण्यात येत आहेत. मागील 15 वर्षांपूर्वी 1000 रुग्णवाहिका आरोग्य विभागाने घेतल्या होत्या. त्या जुन्या, नादुरुस्त झाल्याने व बदलणे आवश्यक असल्याने मागील वर्षी 500 रुग्ण्वाहिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत. राज्यात एकूण 1000 रुग्णवाहिका नव्याने आरोग्य सेवेत दाखल होणार आहेत, याचे समाधान असल्याचेही टोपे म्हणाले.

सुरुवातीला टोपे यांच्याहस्ते फीत कापून रुग्ण्वाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

या केंद्रांना मिळाल्या रुग्ण्वाहिका

औरंगाबाद तालुक्यातील दौलताबाद, गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा, कन्नडमधील करंजखेड, पैठणमधील ढाकेफळ, निलजगाव फुलंब्रीतील गणोरी, जातेगाव आणि सिल्लोडमधील पालोद व पानवडोद आरोग्य केंद्रांना रुग्ण्वाहिका देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *