कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
Summary
कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनीही जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आज जिल्हाधिकारी […]
कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनीही जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कारखाने, खासगी आस्थापना, बँका कंपन्या यांनी मानवी दृष्टीकोनातून लसीकरणात पुढाकार घ्यावा तसेच होम आयसोलेशन बंद करण्यात यावे. नागरिक, व्यापारी यांनी संयम बाळगावा, असे आवाहन करुन लवकरच जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख कमी होईल असा आशावाद श्री. मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ यांनी ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, जिल्ह्यातील पॉझिटीव्हिटीरेट टेस्टिंग, म्यूकर मायकोसिस आदींचा यावेळी विस्तृत आढावा घेतला. सध्या सीपीआरमध्ये 480 रुग्ण भरती असून त्यापैकी 378 रुग्ण कोविड आहेत. या दाखल रुग्णापैकी 75 रुग्ण व्हेटींलेटरवर तर 278 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदी उपस्थित होते.