BREAKING NEWS:
हेडलाइन

कोरोना काळात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख कॉल पूर्ण

Summary

चंद्रपूर वार्ता: लॉकडाऊन काळात अडकलेले नागरिक, प्रवासी व मजुर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना होम आयसोलेशन, मानसिक आरोग्य व स्वास्थ संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी जिल्ह्यात कोरोना कॉल सेंटर उभारण्यात आले आहे.23 मार्च पासून हा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असून आतापर्यंत […]

चंद्रपूर वार्ता: लॉकडाऊन काळात अडकलेले नागरिक, प्रवासी व मजुर तसेच जिल्ह्यातील नागरिकांना होम आयसोलेशन, मानसिक आरोग्य व स्वास्थ संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी जिल्ह्यात कोरोना कॉल सेंटर उभारण्यात आले आहे.23 मार्च पासून हा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असून आतापर्यंत 1 लाख नागरिकांशी थेट संवाद साधून माहिती देऊन मार्गदर्शन व मदतीचा हात दिला आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात हा एकमेव जिल्हा आहे जिथे असा उपक्रम सुरू आहे आणि राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात बाहेर राज्यातून तथा जिल्ह्यातून येणारे प्रवासी, मजूर तसेच क्वॉरेन्टाईन करण्यात आलेले व्यक्ती याच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. नंतरच्या काळात पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य केले.

जिल्ह्यात लॉकडाऊन काळात अडकलेले प्रवासी यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी योग्य ती मदत व माहिती कोरोना कॉल सेंटर द्वारे देण्यात आली.सध्या या केंद्रामार्फत होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांशी रोज संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत आहे तसेच त्याबाबत त्या-त्या प्रभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या रुग्णाच्या प्रकृतीची योग्य ती माहिती वेळोवेळी देण्यात येत असते.

या कॉल सेंटर अंतर्गत रुग्णाच्या वैद्यकीय प्रश्नांचे उत्तर कॉल सेंटर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत देण्यात येते तसेच मानसिक स्वास्थ व आरोग्याबाबत समुपदेशन व मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील उपलब्ध खाटांच्या संख्येबाबत माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना व नागरिकांना कॉलद्वारे देण्यात येते. या संपर्क केंद्राचे काम कक्ष अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्य बघत असुन जिल्हा प्रशासनातील 150 कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली आहे. सदर कॉल सेंटर प्रशासन व नागरिक यामधील दुवा असल्याने जिल्ह्यातील कोविड आजाराबाबतचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले असून लोकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होत आहे.

विक्की नगराळे
शहर प्रतिनिधी
चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *