कोरोना’मुळे एकाकी झालेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनवर्सनासाठी उपसमिती गठित करावी! – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
Summary
धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतीदलांतर्गत उपसमिती गठित करून कोरोना विषाणूमुळे एकाकी पडलेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या […]
धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतीदलांतर्गत उपसमिती गठित करून कोरोना विषाणूमुळे एकाकी पडलेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूमुक्त गावांचा आढावा घेतला. तसेच कृषी, कामगार, परिवहन, रोहयो, आदिवासी विकास विभाग आणि महिला व बालकल्याण विभागचाही सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना विषाणूमुळे एकाकी पडलेल्या आणि मुले लहान असलेल्या महिलांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृती दलाच्या उपसमितीच्या माध्यमातून कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून महिला गट तयार करून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे. त्यांना शेतीपूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन करीत नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावा. शहरी भागातील महिलांना किमान कौशल्य विभागाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावे. तसेच कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या नियमितपणे संपर्कात राहत त्यांच्या अडी- अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह मार्फत राज्यातील सरपंचांना ‘कोविड’वर मात करण्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचे पालन करून अनेक गावे सरपंच व शासकीय अधिकारी यांनी कोरोना मुक्त केलेबाबत सर्व सरपंचांचे त्यांनी अभिनंदन केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने महिला दक्षता समित्यांची पुनर्रचना करावी. महिलांवरील अत्याचार, बालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने जनजागृतीपर मोहीम राबवावी. आवश्यक तेथे सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूमुक्त गावांनी राबविलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. या गावांमध्ये प्रतिपिंड (अँटिबॉडीज) तपासणी मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवावी. घरेलू कामगार, बांधकाम मजूर, रिक्षा चालकांना राज्य शासनाची मदत उपलब्ध होण्यासाठी नोंदणीची सुलभ प्रक्रिया राबवावी, अशाही सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे, कामगार अधिकारी श्री. रुईकर, परिवहन अधिकारी श्री. कदम आदींनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्य:स्थिती याविषयीची माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 122 गावांनी कोरोना विषाणूचा शिरकाव होवू दिला नाही. सध्या केवळ 4 रुग्ण ॲक्टिव्ह असून ते साक्री तालुक्यातील आहेत. आतापर्यंत 45 हजार 790 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 45 हजार 66 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मृत्यूदर रोखण्यात यश आले असून संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस दलाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी कासारेचे सरपंच विशाल देसले, वाघोदेचे गोविंद वाघ, नांद्रेचे अनिल पाटील, लोहगावचे महेंद्र पाटील आदींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांची माहिती दिली.