कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
Summary
उपाययोजनासंदर्भात आढावा नागपूर, दि. 28: कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री […]
उपाययोजनासंदर्भात आढावा
नागपूर, दि. 28: कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योग सह संचालक श्री. धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपाययोजना करण्यात आल्यामुळे दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होत असल्याचे सांगताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. दररोज 50 हजारपेक्षा जास्त पात्र नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून 18 वर्षांवरील युवकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे आवश्यक आहे. 18 ते 44 या वयोगटात सरासरी 13 लाख नागरिक असून त्यांना डोज देण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सुरु करावे, तसेच शहरातील किमान 25 खासगी रुग्णालयासाठी लसीकरणाची सुविधा निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होवू शकेल. लसीच्या उपलब्धतेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.
ग्रामीण भागात 18 वर्षांवरील सरासरी 40 टक्के नागरिकांना पहिला डोज देण्यात आला आहे. तर 9 टक्के नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरात 30 ठिकाणी ऑक्सिजन सेंटर
कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागरिकांना सुलभपणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी 30 ऑक्सिजन वॉक एन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या सेंटरवर ज्या नागरिकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना तात्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी 100 कॉन्सनट्रेटर सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी 100 कॉन्सनट्रेटर जिल्हा निधीमधून खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिली.
कोविडसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच द्रवरुप ऑक्सिजन साठविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच 1 हजार 375 नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यासाठी दररोज 160 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यामध्ये तीनपट जास्त ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावती रोड येथे 600 बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण 1 हजार 800 बेड्स उपलब्ध होतील. त्यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अडचणी येणार नसल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यामध्ये सुमारे दोनशे खाटा बालकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यात नवीन प्रकारचे कोविड रुग्ण आढळले असून यामध्ये उमरेड येथे आठ तर नागपूर येथे चार रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांच्या कोविड तपासणीचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवून तात्काळ रिपोर्ट मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जनतेने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.