BREAKING NEWS:
कृषि नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला गावात दहशतीचे सावट, जनतेत संताप – तातडीने प्रभावी उपाययोजना करावीची मागणी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे हस्ते दहा लाखाचा धनादेश मृतकाचे कुटुंबीयांना सुपुर्द

Summary

कोंढाळी – कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे शेतकरी रमेश मेश्राम यांच्या सर्वे क्र. १७१/१ मधील फार्महाऊससमोर बसलेल्या शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून […]

कोंढाळी –
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे शेतकरी रमेश मेश्राम यांच्या सर्वे क्र. १७१/१ मधील फार्महाऊससमोर बसलेल्या शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांचा मृत्यू घडविला.

घटनेचा तपशील

मिळालेल्या माहितीनुसार, विलास बापूराव कडवे व चंद्रशेखर बल्की हे रात्री फार्महाऊससमोर बसले होते. विलास कडवे झोपायला गेल्यानंतर थोड्याच वेळात चंद्रशेखर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास कडवे बाहेर आले असता, बल्की गंभीर जखमी अवस्थेत मृत पडलेले दिसून आले. घटनास्थळी वाघ-बिबट्याचे पाऊलखूणही आढळून आल्या.

गावचे पोलीस पाटील कमलेश धोटे, सरपंच राजकुमार चोपडे तसेच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेले अधिकारी व कर्मचारी

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. नाईक, उपवनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मालके, आर. एन. डाखोळे (क्षेत्र सहाय्यक, चमेली), तसेच वनरक्षक अमोल गडगिले, विष्णू सावंत, तुकाराम राठोड, किशोर चन्ने, मेघा धनोडे, भूषण राऊत, प्रवीण नन्नवरे, निलेश तवले, सुनील चोपडे, किशोर चव्हाण, सुनिल शिसोदे हे घटनास्थळी दाखल झाले.

त्यांच्यासोबत राजकुमार चोपडे (सरपंच, चिखली), कमलेश धोटे (पोलीस पाटील, चिखली), वनकामगार किशोर कुसळकर, पुंडलिक सरोदे तसेच कोंढाळी पोलीस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहोचले.

वन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा करून मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
*आमदारांचे हस्ते दहा लाखाचा धनादेश दहा हजार रोख*
घटनेची माहिती मिळताच आमदार चरणसिंग ठाकूर यांनी वन विभागाचे अधिकारी यांसोबत मृतक चंद्रशेखर वेंकटराव बल्की यांचे गावी चिखली येथे पोहोचेल तेथे‌ बल्की कुटूंबियांचे सांत्वन केले.‌तसेच‌ मृतक चंद्रशेखर यांचे वडील व्यंकटराव बल्की यांना वन विभागामार्फत मिळालेला दहा लाखाचा धनादेश ‌सुपुर्द केला व अंत्यसंस्कारासाठी‌रोख दहा हजार रुपये ‌दिले. बाकी चे १५लाखाचा धनादेश कागदपत्रे पुर्ण झाल्यावर देण्यात येईल असे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी सांगितले.
या प्रसंगी नागरीकांनी या भागातील हिंस्र प्राण्यांकडू होणार्या त्रासाचा पाढाच वाचला,व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली.
ग्रामस्थांमध्ये दहशत
चंद्रशेखर बल्की हे अल्पभूधारक शेतकरी असून कंपनी बंद झाल्याने मिळेल ते काम करून संसार सांभाळत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेल्या एका वर्षात कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघ-बिबट्यांनी ११० पेक्षा अधिक जनावरे फस्त केली असून आता थेट मनुष्यहानी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना कालर-आय बसविणे, संवेदनशील भागात सेन्सर कॅमेरे बसविणे व ग्रामस्थांना पूर्वसूचना मिळेल अशी प्रणाली विकसित करणे यावर भर दिला आहे.
शेतकरी डॉ. आर. एम. व्हराडपांडे म्हणाले, “हिंस्र प्राण्यांच्या हालचालींवर तातडीने लक्ष ठेवले गेले, तर ग्रामस्थ व शेतकरी वेळेवर सावध राहू शकतात व मोठी हानी टळू शकते.”

ही घटना केवळ ह्रदयद्रावकच नव्हे तर शासन व वन विभागासमोर गंभीर आव्हान उभे करणारी ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, गवळी, शेतमजूर यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *