नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी नगर पंचायत निवडणुकीत नवा इतिहास माय–लेकाची ऐतिहासिक विजयी जोडी; योगेश चाफले कोंढाळीचे पहिले नगराध्यक्ष

Summary

कोंढाळी | प्रतिनिधी कोंढाळी नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत असा राजकीय इतिहास घडला आहे, जो येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत चर्चेचा विषय ठरणार आहे. या निवडणुकीत एकीकडे माय–लेकाने एकत्रित विजय मिळवून भावनिक संदेश दिला, तर दुसरीकडे मतदारांनी नव्या नेतृत्वावर विश्वास टाकत कोंढाळीच्या राजकारणाला […]

कोंढाळी | प्रतिनिधी
कोंढाळी नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत असा राजकीय इतिहास घडला आहे, जो येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत चर्चेचा विषय ठरणार आहे. या निवडणुकीत एकीकडे माय–लेकाने एकत्रित विजय मिळवून भावनिक संदेश दिला, तर दुसरीकडे मतदारांनी नव्या नेतृत्वावर विश्वास टाकत कोंढाळीच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे.
या ऐतिहासिक निवडणुकीत हेमलता बालकिशन पालीवाल यांनी भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदावर विजय मिळवला, तर त्यांचे पुत्र अंकित बालकिशन पालीवाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत भाजपा, काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत नगरसेवक म्हणून दणदणीत यश मिळवले. कोंढाळी नगर पंचायत निवडणुकीत माय–लेकाची ही अनोखी व ऐतिहासिक विजयी जोडी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
पालीवाल कुटुंबाची तिसरी पिढी जनसेवेत
विशेष म्हणजे अंकित पालीवाल यांचे वडील बालकिशन पालीवाल हे यापूर्वी कोंढाळी ग्रामपंचायतीचे सदस्य होते, तर त्यांचे आजोबा ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले आहेत. त्यामुळे पालीवाल कुटुंबाची ही तिसरी पिढी जनसेवेत सक्रिय झाल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले.
योगेश चाफले यांचा नगराध्यक्षपदी दणदणीत विजय
कोंढाळी नगर पंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षपदावर योगेश शेषराव चाफले यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्यांच्या विजयाकडे जनतेचा विश्वास, युवक नेतृत्व आणि विकासाच्या अपेक्षांचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच भाजपाला नगर पंचायतमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
नगराध्यक्ष योगेश चाफले यांचे वडील शेषराव चाफले हे कोंढाळी ग्रामपंचायतीचे दोन वेळा सरपंच तसेच काटोल पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत, तर आई पुष्पाताई चाफले या नागपूर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
अपक्ष उमेदवारांची दमदार कामगिरी
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवून दिली. प्रभाग क्रमांक ६ मधून अंकित पालीवाल (अपक्ष) यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला, तर प्रभाग क्रमांक ११ मधून चंद्रकला इमाने (अपक्ष) यांनी भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने हरवले.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
विशाल सावरकर – भाजपा
मुन्नासिंह शेंगर – भाजपा
विनोद माकोडे – काँग्रेस
सुषमा खोडणकर – भाजपा
सनावर शेख – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
अंकित पालीवाल – अपक्ष
हेमलता पालीवाल – भाजपा
प्रिया पैठे – भाजपा
अम्रपाली नारनवरे – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रज्वल घोटे – राष्ट्रवादी काँग्रेस
चंद्रकला इमाने – अपक्ष
सोनल चाफले – भाजपा
कविता झाडे – भाजपा
बंदे रहमान – काँग्रेस
राहुल नासरे – राष्ट्रवादी काँग्रेस
कमल ईरपाची – भाजपा
गौरव ईरखेडे – भाजपा
पक्षनिहाय संमिश्र निकाल
एकूण सदस्य : १७
भाजपा – ९
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ४
काँग्रेस – २
अपक्ष – २
ऐतिहासिक, भावनिक आणि निर्णायक निवडणूक
कोंढाळी नगर पंचायतची ही पहिलीच निवडणूक माय–लेकाची ऐतिहासिक विजयी जोडी, अपक्ष उमेदवारांची ताकद आणि नव्या युवक नेतृत्वाच्या उदयामुळे कायम लक्षात राहणारी ठरणार आहे. येणाऱ्या काळात कोंढाळी नगर पंचायत विकासाच्या कोणत्या नव्या वाटेवर वाटचाल करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *