कोंढाळी नगर पंचायत क्षेत्रातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावल्या
Summary
कोंढाळी-वार्ताहर- (दुर्गाप्रसाद पांडे) कोंढाळी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील जुन्या घरांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा धोक्याच्या घरांपासून त्यामध्ये राहणा-या नागरिकांना व त्या घराच्या आसपास राहणा-या नागरिकांस तसेच ये-जा करणा-या नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचणे संभव असतो. तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या घरांची तपासणी […]
कोंढाळी-वार्ताहर-
(दुर्गाप्रसाद पांडे)
कोंढाळी नगर पंचायत कार्यक्षेत्रातील जुन्या घरांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा धोक्याच्या घरांपासून त्यामध्ये राहणा-या नागरिकांना व त्या घराच्या आसपास राहणा-या नागरिकांस तसेच ये-जा करणा-या नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचणे संभव असतो. तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या घरांची तपासणी करून धोका नाहीसा करण्याबाबतीत शक्यतो सर्व दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे.
आपापल्या मालकीच्या इमारतीसंबंधी वेळोवेळी तपासणी करून ती इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र नगर पंचायत/ परिषद अधिनियमचे अन्वये प्रत्येक घरमालकाचे आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता आपापल्या इमारतींची तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनियर यांजकडून तपासणी करून घेऊन त्यांच्या सूचनेनुसार व नगर पंचायती कडून आवश्यक ती परवानगी घेऊन इमारत योग्य प्रकारे दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे, अशी व्यवस्था संबंधित धोक्याच्या घरांच्या मालकांनी करावी, अशी सूचना या प्रकटनाद्वारे करण्यात आली आहे. या अनुषंगाने शहरातील एखादी इमारत अगर तिचा काही भाग, छप्परकाम, जिना, पटई काम इ. भाग धोक्याच्या अथवा पडावयास आला आहे असे दृष्टिक्षेपात आल्यास त्याबाबतची लेखी माहिती कोणीही नागरिकाने कोंढाळी नगर पंचायत येथील शहर अभियंता यांच्या कार्यालयात सत्वर द्यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. सदरबाबत धोकेदायक घरांची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना संबंधितांनी इमारत मालकाडून करण्यात याव्या.
येथील काही धोकादायक इमारतीची तपासणी करून त्याच्या अहवालामध्ये धोकादायक व राहण्यास अयोग्य असे नमूद केलेल्या जुन्या घरांमधील मालक/भाडेकरू/रहिवासी यांना महाराष्ट्र नगर पंचायत/परिषद अधिनियमा अन्वये राहती जागा धोका टळेपर्यंत त्वरित खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा नोटिसा बजाविण्यात आलेल्या नागरिकांनी सदर घरे त्वरित खाली करणे आवश्यक आहे.
जे नागरिक अशा धोक्याच्या नोटिसा दिलेल्या किंवा धोकादायक घरात राहत असतील तर ते नागरिक व्यक्तिश: स्वत:च्या जबाबदारीवर राहत आहे. या धोकादायक घरात राहत असताना जर काही अपघात झाल्यास कोंढाळी नगर पंचायत
अपघातास जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अशा घराच्या मालकांनी तज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजि. च्या दुरुस्ती अहवालासह दुरुस्ती प्रस्ताव दाखल करूनच परवानगी घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
अशी माहिती कोंढाळी नगर पंचायत प्रशासक धनंजय बोरीकर यांनी दिली आहे.