नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी नगर पंचायतीत भाजपाचा अधिकृत गट स्थापन; योगेश चाफले गटनेते, विकासाला वेग देण्याचा निर्धार

Summary

कोंढाळी | प्रतिनिधी कोंढाळी नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टीने नगर पंचायतीत आपला अधिकृत गट स्थापन करून सत्तास्थैर्याची मजबूत पायाभरणी केली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गट औपचारिकरित्या अस्तित्वात आला असून, […]

कोंढाळी | प्रतिनिधी
कोंढाळी नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टीने नगर पंचायतीत आपला अधिकृत गट स्थापन करून सत्तास्थैर्याची मजबूत पायाभरणी केली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गट औपचारिकरित्या अस्तित्वात आला असून, या गटाच्या स्थापनेमुळे कोंढाळी नगर पंचायतीतील राजकारणाला स्पष्ट दिशा मिळाल्याचे चित्र आहे.
नगर पंचायत निवडणूक २०२५ मध्ये भाजपाने ९ जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतर दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी भाजपाचे १० निवडून आलेले सदस्य एकत्र येऊन “भारतीय जनता पार्टी कोंढाळी” या नावाने गट स्थापन करण्यात आला. सर्व सदस्यांच्या संमतीने गटाची घटना तयार करण्यात आली असून, पदांची घोषणा करण्यात आली.
या गटात
गटनेते : योगेश शेषराव चाफले
उपगटनेते : मुन्नासिंग चंद्रपालसिंग शेंगर
प्रतोद : सौ. हेमलता बालकिसन पालीवाल
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गटाच्या घटनेनुसार सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने बहुमताने घेतले जाणार असून, ते सर्व सदस्यांना बंधनकारक राहणार आहेत. गटशिस्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधित सदस्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट उल्लेख घटनेत करण्यात आला आहे. तसेच सर्व सदस्य भाजपाशी निष्ठावान राहतील व पक्षाची भूमिका अखंड राखतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गट स्थापन झाल्यानंतर त्यास अधिकृत मान्यता मिळावी यासाठी नागपूर येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर, समीर उमप, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, तसेच नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक उपस्थित होते.
भाजपाचा हा गट स्थापन झाल्याने कोंढाळी नगर पंचायतीत विकासकामांना गती, प्रशासनात सुसूत्रता आणि लोकहिताच्या निर्णयांना प्राधान्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नगराच्या सर्वांगीण विकासासाठी हा गट ठोस आणि एकसंध नेतृत्व देईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *