नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती — लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन नवी रचना करावी, नागरिकांची मागणी

Summary

कोंढाळी (प्रतिनिधी) : कोंढाळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर स्थानिक नागरिकांनी औपचारिक हरकती नोंदवल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या या प्रभाग सीमांवर २१ ऑगस्ट रोजी प्रज्वल नंदकिशोर धोटे व दुर्गेश प्रकाशराव भिसे यांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी […]

कोंढाळी (प्रतिनिधी) :
कोंढाळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर स्थानिक नागरिकांनी औपचारिक हरकती नोंदवल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या या प्रभाग सीमांवर २१ ऑगस्ट रोजी प्रज्वल नंदकिशोर धोटे व दुर्गेश प्रकाशराव भिसे यांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी व नगरपंचायत प्रशासनाकडे हरकती दाखल केल्या.
नागरिकांचे म्हणणे
नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींमध्ये नमूद केले आहे की, सद्याची प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यावेळी कोंढाळी नगरपंचायतीची लोकसंख्या १३,८७७ होती. मात्र नैसर्गिक वाढ लक्षात घेतल्यास २०२५ पर्यंत ही संख्या सुमारे १७,१५० पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच जवळपास ३,२७३ लोकसंख्या वाढ झाली आहे.

नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे की —

२०११ च्या जुन्या आकडेवारीवर आधारित प्रभाग रचना अन्यायकारक आहे.
सध्या प्रत्येक प्रभाग ७५० ते ९०० लोकसंख्येवर आधारित आहे, मात्र कोंढाळी नगर पंचायती मधे आता प्रत्येक प्रभागात सुमारे १००० लोकसंख्या झाली आहे.
विद्यमान वास्तव लक्षात घेऊन अद्ययावत प्रभाग सीमा तयार न करता निवडणूक घेणे म्हणजे मतदारांच्या हक्कांवर गदा आणणे होईल.
स्थानिक मतदारांनी ठाम भूमिका घेत, “निवडणूक विभाग व प्रभाग रचना करणाऱ्या यंत्रणेनं या हरकती गांभीर्यानं घेऊन न्याय्य प्रभाग रचना करावी,” असे‌ हरकती घेणारे प्रज्वल ‌नंदकिशोर धोटे व दुर्गेश प्रकाशराव भिसे यांची हरकतीत अशी मागणी केली आहे.
सुनावणी प्रक्रिया
या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी किंवा नियुक्त प्राधिकृत अधिकारी २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान सुनावणी घेणार आहेत. सर्व पक्षांना आपले मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर सुधारित व अंतिम प्रभाग रचना २ ते ८ सप्टेंबर २०२५ दरम्यान नगरविकास विभागाकडे सादर केली जाणार आहे.

पुढील टप्पे
नगरविकास विभाग ही अंतिम प्रभाग रचना ९ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्य निवडणूक आयोगास पाठवेल. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून मंजुरी देऊन अधिसूचना २६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध केली जाईल. यानंतर प्रभागांची अंतिम रूपरेषा निश्चित होऊन नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीस अधिकृत स्वरूप मिळेल.
*नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व*
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांचा सहभाग या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे. प्रभाग रचनेत भौगोलिक व लोकसंख्येचे संतुलन राखणे, मागासवर्गीय घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे आणि भविष्यातील नगर विकासाच्या दृष्टीने योग्य सीमांकन करणे हे उद्दिष्ट आहे.

👉 अशा प्रकारे, हरकती व सूचनांनंतर कोंढाळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग निश्चित होणार असून, स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *