कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – कृषी मंत्री दादाजी भुसे
Summary
धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक […]
धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी राज्यस्तरीय महिला किसान दिन कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, प्रगतिशील महिला शेतकरी चंद्रकला वाणी, शोभा जाधव, प्रियांका जोशी, वंदना पाटील, भारती भदाणे आदी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ- मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेत एक हजार रोपवाटिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेत महिलांनी शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध करून द्यावीत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या- त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावरील प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगामी काळात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना तातडीने मान्यता देण्यात येईल. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे दिवाळीपूर्वी वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 31 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असेही आवाहन कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले.
महापौर श्री. कर्पे म्हणाले, सैन्य दलातील जवान आणि शेतकरी हे देशाचे महत्वपूर्ण घटक आहेत. शेतकऱ्यांचे कार्य अलौकिक आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार श्रीमती गावित म्हणाल्या, भारत कृषी प्रधान देश आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिला शेतीत राबतात. त्यामुळे राज्य शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शेती संबंधित निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविला पाहिजे. तसे झाल्यास आगामी काळात शेतीचे चित्र बदललेले दिसेल. निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा म्हणून महिलांसाठी शेती शाळांचे आयोजन करण्यात आले होते. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महिलांचा सहभाग वाढविण्यात येईल. कृषी विभागाचे आयुक्त धीरजकुमार यांनी कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालायाविषयी ऑनलाइन मार्गदर्शन करीत माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अतुलनीय आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील.
महिला शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात. त्यांना आता मार्केटिंगचे तंत्र याविषयीचे प्रशिक्षण मिळावे , अशी अपेक्षा श्रीमती जाधव, श्रीमती जोशी, श्रीमती वाणी यांनी व्यक्त केली. यावेळी धुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध पदार्थ, साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याची पाहणी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केली. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
राज्यातील महिला शेतकऱ्यांशी संवाद
महिला किसान दिनानिमित्त कृषी मंत्री श्री. भुसे यांनी राज्यातील महिलांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांच्या अडी- अडचणी समजून घेतल्या. मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी नम्रता पराळ (ता. अंबरनाथ, जि. ठाणे), भावना निकम (दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक), छाया दीपक चव्हाण (सावदा, ता. रावेर, जि. धुळे), कांचनताई परुळेकर (कोल्हापूर), जयश्री उज्ज्वल जोशी (औरंगबाद), साधना दीपक देशमुख (मुरुड, ता. जि. लातूर), जयश्री किशोर पारधी (जि. नागपूर) आदींचा समावेश होता.
00000
‘विकेल ते पिकेल’ योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना सामावून घ्या! – कृषीमंत्री दादाजी भुसे
धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसह नावीण्यपूर्ण योजनांमध्ये धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांच्या समावेश करून घ्यावा, अशा सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केल्या.
कृषी मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी कृषी महाविद्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, ‘आत्मा’चे उपसंचालक शांताराम मालपुरे यांच्यासह कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेत त्यांना विकल्या जाणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करावे. येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांचा वेळेवर पुरवठा होईल याचे नियोजन करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळवून द्यावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, अशाही सूचना कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जोशी यांनी सांगितले, गेल्या खरीप हंगामात तीन लाख 96 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला होता. यंदाच्या रब्बी हंगामासाठी 1 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बि- बियाणे, रासायनिक खतांचा शेतकऱ्यांना वेळेत पुरवठा होईल याचेही नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.