कृषि संजीवनी मोहीम-२०२१ अंतर्गत फळपिके उत्पादक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा मनमोकळा संवाद शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल कृषी विद्यापीठांनीही घ्यावी
Summary
अहमदनगर: कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विषयक विविध बाबींवर संशोधन होत असताना राज्यात ठिकटिकाणी शेतकरी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ म्हणून राज्यात अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनीही त्यांच्या या प्रयोगांची दखल घ्यावी […]
अहमदनगर: कृषी विद्यापीठांमध्ये कृषी विषयक विविध बाबींवर संशोधन होत असताना राज्यात ठिकटिकाणी शेतकरी वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना पाठबळ म्हणून राज्यात अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनीही त्यांच्या या प्रयोगांची दखल घ्यावी आणि याबाबत त्यांना अधिक मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृहात आज (सोमवारी) कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे कृषी संजीवनी मोहीमेअंतर्गत कृषीमंत्री दादा भुसे यांनी फळपीके उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कृषी संचालक विकास पाटील, कैलास मोते, सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपसंचालक विलास नलगे तसेच उद्यानपंडित पुरस्कार विजेते युवा शेतकरी राहुल रसाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणाली द्वारे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह विविध भागातून शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना श्री. भुसे म्हणाले की, सध्या अनेक शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. त्यांच्या या संकल्पना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण अशा पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक बनवली आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात कृषी विद्यापीठाचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला ही आनंदाची बाब आहे. फळपीक उत्पादनात नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर आहे. फळपीकातील प्रयोगशील शेतकरी व कृषी विद्यापीठाच्या मदतीने जास्ती काळ फळ टिकणारे वाण विकसीत करण्यावर भर दिला जाणार आहे असे ते म्हणाले.
कृषी संजीवनी योजनेतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन कसे करता येईल यावर कृषी विभागाचा भर आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात केवळ दोन ते अडीच लाख हेक्टर फळबागाची क्षेत्र होते. आता ते क्षेत्र वाढले आहे. फळपीक विमा योजनेत सिताफळ, स्ट्रॉबेरीचा समावेश केला आहे. फळपीक लागवडीसाठी लागणारी रोपे कोणत्या भागात किती उपलब्ध आहेत याबाबत ऑनलाईन माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. अन्य पिकातही एक गाव एक वाण ही संकल्पना पुढे आणली जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी शेती आणि शेतकरी विकासासाठी कृषी विभाग काम करत असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
फळपीक विमा योजनेबाबत सध्या ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत राज्य शासनही विचार करीत आहे. गेल्या वर्षी साधारण पाच हजार आठशे कोटी रुपयाचे विमा हप्ता जमा झाला, मात्र अवघे 900 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे विमा योजनेचे नवे मॉडेल आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप त्यास केंद्राने मान्यता दिलेली नसल्याने मागच्या वर्षी असणारी योजनाच यावर्षी राबविली जात आहे. फळबाग पीक विमा योजना ऐच्छिक असून त्यातील अटी आणि शर्तींचा विचार करुन शेतकऱ्यांनी ती स्वीकारायची किंवा नाही, याचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेता यावा आणि त्यासाठी वारंवार अर्ज करण्याची गरज पडू नये, यासाठी एकदाच शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतला जाणार असून त्याला कोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, याचा प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. त्यानंतर तालुकानिहाय दिलेल्या इष्टांकानुसार संबंधित शेतकऱ्यांना त्या-त्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात पुरेसा युरिया साठा उपलब्ध आहे. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यासाठी बफर स्टॉक करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा कृषी कार्यालयाला दिल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तसेच खताबरोबरच एखाद्या ठराविक वाणाचे बियाणे घेण्याचा आग्रह संबंधित दुकानदार करीत असेल तर अशा तक्रारी थेट कृषी विभागाकडे करा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी, शेतकऱ्यांचे फळबाग लागवड आणि त्या अनुषंगाने त्यांना आलेले अनुभव ऐकले. कृषी विभागाचे अधिकारी सहकार्य करतात ना, काही अडचण नाही ना.. अशा प्रश्नांनी त्यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि त्यातील अधिकारी – कर्मचारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविता आल्याचे आवर्जून सांगितले. त्यावर कृषीमंत्र्यांनीही हसून त्याला दाद दिली आणि कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते फळपीक उत्पादनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकरी तसेच फळपीक लागवडीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या कृषी सहायकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी सचीव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरजकुमार यांनीही शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. या संवादात दीपा ससे, राहुल रसाळ, आनंदराव गाडेकर, संगीता मारूती डाके, बाळासाहेब कारखिले, समाधान भोसले (पापरी ता. मोहोळ), निर्मला खुबाळकर (खुबाळा ता. सावनेर), रमेश जिचकार (नागझरे, अमरावती), शिवराज येरनाळे (तोगरी ता. उदगीर), सुरेश नवले (अकोले) या शेतकरयाशी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. भुसे यानी फळबाग लागवडीबाबत चर्चा करून माहिती विचारली. निघोज (पारनेर) येथील युवा शेतकरी राहुल रसाळ यांच्या करटुले शेतीप्रयोगाचे त्यांनी कौतुक करत त्याची पाठ थोपटली.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत फळबाग लागवड, स्वयंचलीत खत व ठिबक सिंचन प्रकल्पाचे उदघाटन यावेळी त्यांच्या हस्ते धाले. कृषि संजीवनी मोहीम” अंतर्गत २१ जून २०२९ रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान ( रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान ), दिनांक २२ जून रोजी बिजप्रक्रिया, दिनांक २३ जून रोजी जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, दिनांक २४ जून रोजी कापूस एक गांव एक वाण आणि भात, ऊस, कडधान्य व तेलबिया सुधारीत तंत्रज्ञान, दिनांक २५ जून रोजी विकेल ते पिकेल या मोहीमा राबविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.