BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनी मराठी वरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला शुभेच्छा

Summary

मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचा, कीर्तन शक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहे, की जो […]

मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचा, कीर्तन शक्तीचा, प्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहे, की जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रवींद्र नाट्यमंदिर येथे सोनी मराठी आणि पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स, चितळे बंधू यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी प्रा.सदानंद मोरे, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाचे परीक्षक ह.भ.प. राधाताई सानप, ह.भ.प. जगन्नाथ पाटील महाराज, सोनी एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक  आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेवर कार्यक्रम तयार केला याबद्दल सोनी मराठीचं मनापासून अभिनंदन. माध्यमं बदलत आहेत. आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, त्याच्यामध्ये सोनीसारखे प्लॅटफॉर्मची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

कीर्तन ही अतिशय जुनी परंपरा आहे आणि कीर्तनकारांनी कीर्तनातून, निरूपणातून, अभंगातून, गायनातून, जे विचार समाजामध्ये पोहोचवले, जे समाज प्रबोधन केलं, ते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. कीर्तनातून लोकप्रबोधन केलं जाते. सामान्य माणसाला भक्ती परंपरेशी जोडून, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाही, त्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न कीर्तनामधून केला जातो. या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य म्हणजे कीर्तनकारांकडे जगाचं ज्ञान आहे, वैश्विक विचार आहे, पण तो वैश्विक विचार सांगत असताना तो साध्या भाषेमध्ये  सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, सावता महाराजांचे १७वे वंशज ह.भ.प. रवीकांत महाराज वसईकर, शेख महंमद महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. जब्बार महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, संताजी महाराज जगनाडे यांचे १४वे वंशज ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, संत बहिणाबाईंचे १३वे वंशज ह.भ.प. प्रमोद पाठक, संत नरहरी महाराज यांचे २१वे वंशज शंकर महामुनी, संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात विजयी ठरणाऱ्या कीर्तनकारास देण्यात येणाऱ्या चांदीची सुंदर, सुबक वीणाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *