महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

काश्मीर पुनश्च भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Summary

मुंबई दि. २१ – काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत.  भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून  काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल […]

मुंबई दि. २१ – काश्मीरची वाटचाल स्थैर्य व शांतीकडे सुरू झाली असून सर्वसामान्य लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत आहेत.  भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीरचे योगदान अनन्यसाधारण असून  काश्मीर प्रदेश लवकरच आपले गतवैभव प्राप्त करील व पुनश्च देशाचे नंदनवन होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने आज राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी  ते बोलत होते.

हिंदी काश्मीर संगम- काश्मीर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या “केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक” पुस्तकाचे तसेच ‘कश्मीर संदेश’ या नियतकालिकाचे राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले, काश्मीर 700 ते 800 वर्षापूर्वी भारताचा गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

काश्मीर ही अभिमन्यू गुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू असून ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणे ही गौरवास्पद बाब आहे. मात्र, संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काश्मीरमध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या डॉ. बिना बुदकी यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौरवार्थींनीही भविष्यात साहित्य – शिक्षा आणि लोकसेवेचे कार्य अवरित सुरू ठेवावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *