बुलडाणा महाराष्ट्र हेडलाइन

कालबद्ध कार्यक्रम ठरवून लसीकरण पूर्ण करा – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

Summary

नवीन शासकीय रूग्णालय इमारतीचा तातडीने प्रस्ताव सादर करावा बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : कोरोना रूग्णांची जिल्ह्यातील संख्या हळू हळू वाढताना दिसत आहे. आरोग्य संस्था व तज्ज्ञांनी संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. […]

नवीन शासकीय रूग्णालय इमारतीचा तातडीने प्रस्ताव सादर करावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : कोरोना रूग्णांची जिल्ह्यातील संख्या हळू हळू वाढताना दिसत आहे. आरोग्य संस्था व तज्ज्ञांनी संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेत संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. उद्दिष्टाच्या अनुषंगाने 60 ते 70 टक्के लसीकरण झाले पाहिजे. यंत्रणांनी कालबद्ध व धडक कार्यक्रम ठरवून पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ.शिंगणे बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिनाक्षी बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सहा आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते.

सध्या सक्रीय असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरण न देण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, कोरोना बाधित रूग्णांना घरी ठेवू नका. त्यांच्यामुळे आणखी संसर्ग वाढतो. त्यांना सक्तीने रूग्णालयात ठेवावे. शासकीय रूग्णालयांतील सुविधांचा दर्जा चांगला ठेवावा. जेणेकरून रूग्ण उपचार घेतील.  तसेच ज्या तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून एकही रूग्ण निघत नाही. तिथे तपासण्या वाढवाव्यात. त्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावा. मागील लाटेमध्ये मान्यता दिलेल्या खाजगी कोविड रूग्णालयांची मान्यता पुन्हा तपासून घ्यावी. त्यासाठी सदर रूग्णालयांमधील सुविधांचा आढावा घ्यावा व पुढे मान्यतांचे नूतनीकरण करावे.

ते पुढे म्हणाले, कोविड काळात सर्वात महत्वाचा घटक हा प्राणवायू पुरवठा ठरतो. मागील लाटेवेळी 17 मेट्रीक टन उच्चांकी मागणी होती. भविष्यात लाट आल्यास दुप्पट मागणी गृहीत धरून आतापासून नियोजन करून ठेवावे. कार्यान्वीत होणारे प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची कामे पूर्ण करावे. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात असलेले डायलिसीस युनीट जुने झाली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी  किंवा तांत्रिक अडचणीमुळे युनीट बंद आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले डायलिसीस युनीट खरेदी करावे. त्यापूर्वी जुन्या युनीटची तपासणी करून सद्यस्थिती तपासून घ्यावी. महसूल, ग्रामविकास व गृह विभागाने आपल्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही लावून घ्यावेत. त्याचे नियंत्रण जिल्हास्तरावर ठेवावे. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांवर जरब बसून नागरिकांची कामे गतीने होतील.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची बांधकामे झाली आहेत. अशा ठिकाणी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. जिल्हा रूग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. सदर इमारतीला अनेकवेळा डागडुजी करण्यात आली आहे. ही इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सादर करावा. जिल्ह्यात शहरी भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण झाले आहे. मात्र ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट झालेले नाही. त्याचाही प्रस्ताव पाठवून ग्रामीण भागातील शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट पूर्ण करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सणा सुदीचे दिवस लक्षात घेता मिठाई व मिष्टान्नामध्ये भेसळ तपासणीसाठी मोहिम सुरू करावी. अन्न पदार्थांवर बेस्ट बिफोरची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करावी. होत नसल्यास कारवाया वाढविण्यात याव्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले.   बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *