कारंजा घाडगे तालुक्यात 192 कोटींची मेफेड्रोन ड्रग्स फॅक्टरी उघड — विधीमंडळात भाजप आमदार सुमीत वानखेडे यांचा संतप्त सवाल: “MD ड्रग्स आता थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत!”
कारंजा घाडगे (वर्धा) / नागपूर —
विदर्भात माफियांनी जाळे इतक्या गुप्तपणे पसरवले आहे की, चकित करणाऱ्या घटनांची मालिका थांबता थांबत नाही. महसूल गुप्तचर विभागाने (DRI) ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्याच्या जंगलात कार्यरत मेफेड्रोन (MD ड्रग्स) निर्मितीची प्रचंड फॅक्टरी उद्ध्वस्त केली.
या कारवाईत 128 किलो तयार मेफेड्रोन (बाजारभाव—192 कोटी रुपये) आणि 245 किलो प्रीकर्सर केमिकल्स जप्त करण्यात आले. आधुनिक रिअॅक्टर, मिक्सिंग टँक, तापमान नियंत्रक, अत्याधुनिक उपकरणे यांच्यासह संपूर्ण औद्योगिक स्तरावरील ड्रग्स भट्टी येथे सुरू असल्याचे DRI ने पुष्टी केली आहे.
—
विधानसभेत आमदार सुमीत वानखेडे यांचा स्फोटक सवाल
नागपूरमध्ये शीतकालीन अधिवेशन सुरू असताना अवघ्या जवळच्या तालुक्यात ड्रग्स फॅक्टरी सापडल्याने विधीमंडळात खळबळ उडाली.
आर्वीचे भाजप आमदार सुमीत वानखेडे यांनी विधानसभेत थेट सवाल उपस्थित केला:
“MD ड्रग्स आधी शहरांपुरते मर्यादित होते, पण आता ते थेट ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांच्या दारात पोहोचत आहे! वर्धा पोलिस झोपेत आहेत का? किंवा कोणत्या संरक्षणाखाली ही फॅक्टरी चालली? सरकारने स्पष्ट करावे.”
“192 कोटींच्या ड्रग्स मागचा असली तस्कर कोण? त्यांची नावे सभागृहात जाहीर करून कारवाईची माहिती दिली जावी.”
—
“स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नाही”—चक्क थानेदाराचे विधान
कारंजा पोलिस ठाण्याचे प्रभारी महेश भोरटेकर यांनी म्हटले:
“ही कारवाई नागपूर पोलिस व DRI कडून झाली, आम्हाला पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.”
यामुळे संपूर्ण जिल्हा पोलिसांच्या गुप्त माहिती नेटवर्कवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
—
काटोल–नागपूर–कारंजा ड्रग नेटवर्कचा उलगडा
कारवाईनंतर लगेच नागपूर नारकोटिक्स सेलने कारंजा शहरात धाड घालून तीन युवकांना ताब्यात घेतले:
1. वैभव (भय्यू) हिरालाल अग्रवाल (35)
2. यश (आलू) धनराज बन्नगरे (20)
3. सोहम संजय धायगोडे (21)
हे तिघे १ ते १.५ वर्षांपासून ड्रग्स उत्पादन व पुरवठ्यात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
काटोल परिसरातील अनेक ड्रग्स हँडलर यापूर्वीच नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
—
राजकीय वर्तुळात खळबळ — “गृहमंत्रींच्या जिल्ह्यातच ड्रग्सचे साम्राज्य?”
192 कोटींची मेफेड्रोन फॅक्टरी
+
अवैध गांजा विक्री
+
अवैध देशी दारू उत्पादन
+
मार्गावरील तस्करी
हे सर्व नागपूर व वर्धा जिल्ह्यांत सुरू असल्याचे उघड होताच राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे:
“गृहमंत्री व गृहराज्यमंत्री ज्या जिल्ह्यांतील आहेत, तिथेच ड्रग्सचे नेटवर्क वाढत आहे का?”
25 दिवसांपूर्वी काटोलमध्ये मोठी गांजाची खेप पकडली गेली होती; तरीही ग्रामीण भागात पुन्हा विक्री सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
—
उभे ठाकलेले कठोर प्रश्न
192 कोटींची ड्रग्स तयार होत होती, पण स्थानिक पोलिसांना खबर कशी लागली नाही?
एवढी मोठी फॅक्टरी कोणाच्या संरक्षणाखाली चालली?
ड्रग्सचे नेटवर्क राजकीय संरक्षणात तर नव्हते ना?
ग्रामीण भागात मादक द्रव्यांचे साम्राज्य वाढण्यामागचा धागा कोणत्या टोळ्यांकडे जातो आहे?
—
“ही गांधींची भूमी… येथे नशेचे कारखाने कसे?”— स्थानिकांचा संताप
कारंजा–घाडगे जंगलात उत्तम सुविधा असलेला ड्रग्स प्लांट चालू होता, हे समजताच परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांचे मत—
“शेतकरी, विद्यार्थी, युवक यांना ड्रग्सच्या दलदलीत ढकलणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा मिळालीच पाहिजे.”
—
DRI च्या ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ ने राज्याला हलवून सोडले
ही कारवाई विदर्भातील आतापर्यंतची सर्वांत मोठी MD मेफेड्रोन जप्ती ठरली आहे.
राज्य सरकारकडून याप्रकरणी गृहमंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी वाढत आहे.
—
