कामगार कल्याणासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ . सुरेश खाडे
सांगली ( जि.मा.का. ) दि. २६ : राज्यात सुमारे ५ लाख ८ हजार घरेलू कामगारांची नोंदणी झाली असून, आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडात सुमारे ३० हजार ५०० इतक्या घरेलू कामगारांची नोंदणी महामंडळात करण्यात आली आहे . या घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी शासन पर्यायाने आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे यांनी दिली.
मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्यावतीने, आज घरेलू कामगारांना गृह उपयोगी वस्तु संचचे वितरण पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ ,सहाय्यक कामगार आयुक्त (कोल्हापूर) विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त (सातारा) आर.एन.भिसे, सहाय्यक कामगार आयुक्त (सांगली) मुजम्मिल मुजावर ,माजी नगरसेविका तथा घरेलू कामगार संघटक स्वाती शिंदे, श्रीमती सुमन खाडे आदी उपस्थित होते .
ते पुढे म्हणाले ,घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असणाऱ्या कामगारांसाठी विभागामार्फत चार लाभार्थी योजना सुरू असून, मागील वर्षभरात या कामगारांना विविध योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 88 लाख इतकी लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर मंडळामार्फत अदा करण्यात आली .सांगली जिल्ह्याचा विचार करता 2 हजार 424 इतक्या कामगारांची नोंद झाली असून आज या मेळाव्यामध्ये 1324 घरेलू कामगारांना अंदाजित 9हजार रुपये इतक्या किंमतीच्या भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे .उर्वरित घरेलू कामगारांनाही लवकरच मेळावा घेऊन त्यांनाही याचे वाटप केले जाईल असे सांगितले .
यावेळी श्रीमती प्रणाली कोळी व रूपाली पन्हाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ तर आभार प्रदर्शन सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मुजावर यांनी केले .
बालगंधर्व नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीमती ज्योती कांबळे, प्रवीण लावंड, अनघा कुलकर्णी, अरुण राजमाने, काकासाहेब धामणे, स्नेहल जगताप , आम्रपाली कांबळे,अनुप वाडेकर, यांच्यासह हजारो घरेलू कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000