नागपुर महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

काटोल स्फोटप्रकरणी उच्चस्तरीय बैठक; २० मृत, १९ जखमी – ८२ लाखांची भरपाई जाहीर

Summary

नागपूर/कोंढाळी (प्रतिनिधी): काटोल तालुक्यातील राऊळगाव (एवनीरा परिसर) येथे १ मार्च रोजी सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय हालचाली सुरू केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार या दुर्घटनेत २० कामगारांचा मृत्यू तर १९ कामगार जखमी झाले आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा […]

नागपूर/कोंढाळी (प्रतिनिधी): काटोल तालुक्यातील राऊळगाव (एवनीरा परिसर) येथे १ मार्च रोजी सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर प्रशासनाने तातडीने उच्चस्तरीय हालचाली सुरू केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार या दुर्घटनेत २० कामगारांचा मृत्यू तर १९ कामगार जखमी झाले आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीस राज्यमंत्री आशीष जैस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मृत व जखमींसाठी मोठी आर्थिक मदत
बैठकीत मृत व जखमी कामगारांसाठी मोठ्या आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात आली.
मृत कामगारांच्या कुटुंबीयांना एकूण ८२ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीकडून ७५ लाख, राज्य सरकारकडून ५ लाख आणि केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम मृतकांच्या कुटुंबीयांच्या संयुक्त खात्यात जमा केली जाणार आहे.
जखमी कामगारांसाठी २५.५० लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली असून त्यात कंपनीकडून २५ लाख व केंद्र सरकारकडून ५० हजार रुपये समाविष्ट आहेत. तसेच स्वतंत्र राहत पॅकेज जाहीर करून मागील स्फोटप्रकरणातील ४८ जखमींनाही त्याचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; कठोर कारवाईचे संकेत
या स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक, संचालक, प्लांट हेड आणि व्यवस्थापकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ – सदोष मनुष्यवध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि निष्काळजीपणाचे संकेत मिळाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व विभागांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. PESO, DIC आणि लेबर कमिश्नर कार्यालयाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
उद्योग सुरक्षेसाठी व्यापक निर्णय
घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व अति-संवेदनशील, लघु व मध्यम उद्योगांची सुरक्षा पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व उद्योगांसाठी कठोर SOP (Standard Operating Procedure) लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उद्योगांसाठी स्वतंत्र आपदा व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात येणार आहेत.
कामगारांसाठी दिलासा उपाय
कंपनी बंद असताना सर्व कामगारांना नियमित वेतन दिले जाईल, तसेच कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतर कामगारांना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली.
स्फोटाची प्राथमिक माहिती
१ मार्च रोजी सकाळी ७ ते ८.३० दरम्यान १६-बी आणि २०-बी नॉनल क्रिम्पलिंग युनिटमध्ये सलग स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. जंगल परिसर असल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठी आर्थिक मदत जाहीर झाली असली तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चौकशी अहवालानंतर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *