काजू उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी राज्यात स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारणार – पणन मंत्री जयकुमार रावल
Summary
मुंबई, दि.२५ : राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठी काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून ते […]
मुंबई, दि.२५ : राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठी काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करण्याकरिता राज्यात व्हिएतनाम व कंबोडियाच्या धर्तीवर अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी नियोजन करावे,काजू उत्पादन वाढवून राज्य आत्मनिर्भर कसे होईल या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य काजू परिषद अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिल्या. ते राज्य काजू परिषद संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.
मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक मंडळाचे अध्यक्ष तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ चे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, अपेडा चे उपसरव्यवस्थापक वाघमारे तसेच शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक मनीष दळवी, डॉ. परशराम पाटील, धनंजय यादव,रुपेश बेलोसे उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले, राज्यात काजूची चांगली उत्पादन क्षमता असताना काजू प्रक्रियेसाठी आयात करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात काजू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी काजू लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी काजू उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, उत्पादक क्षेत्रात साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे नियोजन करावे,छोट्या काजू प्रक्रियादरांसाठी योजना राबवाव्यात, व्हिएतनाम व कंबोडियातील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून त्या धर्तीवर अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभे करून काजू मूल्यवर्धन साखळी विकसित करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी काजू परिषद व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. काजू उत्पादनाचे आवश्यक उद्दिष्ट निश्चित करून तज्ञ मनुष्यबळाच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच अपुऱ्या साठवणूक क्षमतेमुळे काजू साठवणुकीबाबत स्थानिक पातळीवर अडचणी येतात. त्यामुळे काजू उत्पादक क्षेत्रात स्थानिक पातळीवर साठवणूक वाढवण्यासाठी महिला बचत गट व सेवा संस्थांचा सहभाग वाढवून त्यांना सोलर ड्रायर युनिट देण्यासाठी नियोजन करावे. ५००, एक हजार व ५ हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारण्याचे नियोजन करावे. या माध्यमातून सुमारे १ लाख ते १.२५ लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी आवश्यक ते अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
व्हिएतनाममधील पूर्णपणे स्वयंचलितकाजू प्रक्रिया प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे, आधुनिकीकरणाबाबतआराखडा तयार करणे तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी फिजिबिलीटी रिपोर्ट (DFR) तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबत चर्चा झाली. २५० मेट्रिक टन क्षमतेच्या काजू प्रक्रिया उद्योगासाठी पालघर येथे जागा उपलब्ध करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच प्रोत्साहन पॅकेज योजना २०१९ अंतर्गत काजू प्रक्रिया प्रकल्प उभारणे, व्हिएतनाम व कंबोडियाच्या धर्तीवर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारणे, अपेडाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया प्रकल्पांचे आधुनिकीकरण करणे व गोदाम योजना अशा विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून मंत्री जयकुमार रावल यांनी आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश दिले.
००००
