BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कंत्राटदार खातो तुपाशी, कामगार मात्र उपाशी..!

Summary

मुंबई महापालिकेतील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खात्याची विविध रुग्णालये तसेच दवाखाने, घनकचरा व्यवस्थापन खाते व इतर विभागात कार्यरत असणाऱ्या सर्वच कंत्राटी कामगारांच्याबाबत असे निदर्शनास आले आहे की, त्यांना देण्यात येणारे मासिक वेतन हे अगदीच तटपुंजे आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे […]

मुंबई महापालिकेतील प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खात्याची विविध रुग्णालये तसेच दवाखाने, घनकचरा व्यवस्थापन खाते व इतर विभागात कार्यरत असणाऱ्या सर्वच कंत्राटी कामगारांच्याबाबत असे निदर्शनास आले आहे की, त्यांना देण्यात येणारे मासिक वेतन हे अगदीच तटपुंजे आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन, किमान वेतन कायद्यानुसारच देण्याचा नियम असल्याने, पालिकेच्यावतीने तेवढ्या रक्कमेचे टेंडर संबंधित कंत्राटदारास देण्यात येते. मात्र रेकॉर्डवर असलेले वेतन व वास्तवात त्यांच्या हातात कंत्राटदार जे मनमानीपणे वेतन देतो त्याच्यात प्रचंड तफावत असते. साधारणतः रू. ७ हजार ते १०५०० ईतके वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले जाते अशी माहीती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी दिली आहे.
ईगल सिक्युरिटी एजन्सीचे कंत्राटी सुरक्षारक्षक पालिकेच्या सुरक्षादलात कार्यरत आहेत. त्यांना दर महिन्याला वेतन न देता 2 ते 3 तसेच कधीकधी 4 महिन्यातून एकदा वेतन दिले जाते. महिला सुरक्षा रक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही ईगल सिक्युरिटीच्या सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक रजा दिली जात नाही. पीएफ रक्कम जमा केला जात नाही. त्यामुळे त्यांना पीएफच्या पावत्या दिल्या जात नाहीत, पगारपावती दिली जात नाही. ‘राज्य कामगार विमा योजनेचे’ पैसे कापले जातात पण अजुनही त्यांना त्यांचे ओळखपत्र देण्यात आलेले नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे, काही अडचणीमुळे एखादे वेळेस खाडे झाले तर कंत्राटदार 1000 रू दंड आकारतो वर एक दिवसाचा पगार कापुन घेतो. अतिरिक्त तासाचे पैसे तसेच रजा दिली जात नाही अशा अनेक अडचणींना कंत्राटी सुरक्षा रक्षकांना सामोरे जावे लागत आहे.
तरी, पालिकेतील विविध खात्यात काम करणाऱ्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार मासिक वेतन देण्याचे आदेश व्हावेत. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणुक थांबवावी, अशी विनंती ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *