BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई शिक्षण हेडलाइन

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा – विद्यापीठ भेटीप्रसंगी राज्यपालांकडून अपेक्षा

Summary

मुंबई, दि. 29 : महर्षी कर्वे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील २५ वर्षांत आपले स्वरूप कसे असावे याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा अशी सूचना […]

मुंबई, दि. 29 : महर्षी कर्वे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील २५ वर्षांत आपले स्वरूप कसे असावे याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल यादृष्टीने विचार करावा अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केली. शिक्षकांनी अध्यापन करताना मातृभाषा, भारतीय संस्कृती व नितीमूल्य याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करावी, अशीही सूचना श्री.कोश्यारी यांनी केली.

राज्यपाल कोश्यारी यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू येथील परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसेच प्राचार्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी व प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

जगात आज जेंडर इक्वालिटीचा विचार होत असेल. परंतु भारताने त्याहीपुढे जाऊन स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केले आहे. धरणी माता, जगन्माता जगाचे संचलन व परिपोषण करतात, हा भारताने दिलेला विचार आहे. संस्थापक महर्षी कर्वे तसेच दानशूर ठाकरसी यांच्या योगदानाचा उल्लेख करून एसएनडीटी विद्यापीठाने स्त्री उत्कर्षासाठी सातत्याने काम करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ येत्या दि. २ जुलै रोजी संपत आहे, याचा उल्लेख करून  राज्यपालांनी त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाने जुहू येथे सौरऊर्जा प्रकल्प राबवून पारंपरिक ऊर्जेची बचत केली. विद्यापीठात भारतातील पहिले महिला अध्ययन संशोधन केंद्र आहे तसेच गृहविज्ञान विषयाचे पहिले स्वायत्त महाविद्यालय असल्याचे कुलगुरू वंजारी यांनी सांगितले. निधीअभावी विद्यापीठ काही बाबतीत दुर्लक्षित राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्र-कुलगुरू मगरे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *