एनडीआरएफच्या पथकाकडून नागरिकांचे स्थलांतर सुरू – जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी

महापूराच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालये शनिवार व रविवार दिवशी सुरू राहणार
मिरज व पलूस तालुक्यातही एनडीआरएफ पथके तैनात
सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील महापूर परिस्थिती पाहता प्रशासनामार्फत पूर बाधित पट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. याकामी एनडीआरएफ चे एक पथक आपत्कालीन शोध व सुटका साहित्यासह दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता आष्टा येथे दाखल झाले असून या पथकामध्ये 25 जवान आहेत. त्यांच्यामार्फत लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
दि. 23 जुलै रोजी रात्री आणखी एक एनडीआरएफ पथक दाखल होत असून हे पथक सांगली मध्ये शोध व सुटका बाबत कामकाज कामकाज सुरू करणार आहे. तसेच सांगली जिल्ह्याकरिता 12 महार बटालियन पुणे यांचे पथक (68 जवान) पुण्याहून येत असून दि. 23 जुलै 2021 रोजी रात्री पर्यंत उपलब्ध होणार असून हे पथक पलूस व मिरज तालुका या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे. ही पथके उपलब्ध झाल्यामुळे आपत्तीच्या काळात शोध व सुटका इत्यादी कामकाजामध्ये एनडीआरएफ पथकाची तात्काळ मदत होणार आहे. महापूराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय शनिवार व रविवार दोन्ही दिवशी चालू ठेवण्याबाबतचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीच्या काळात तसेच वाढत्या पाण्याजवळ जावून कोणताही धोका पत्करू नये. अफवावर विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर पाहण्याकरीता नागरिकांनी गर्दी करू नये. प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच पूराच्या कालावधीत संयम बाळगून आपली व आपल्या कुटुंबाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.