BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू; विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही नागपूरमधील सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मेट्रो मार्गासह फ्रीडम पार्कचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-फ्लॅगद्वारे उद्घाटन

Summary

नागपूर, दि. 20:  राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू, हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

नागपूर, दि. 20:  राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू, हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

 

सीताबर्डी- झीरो माईल फ्रिडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शन आणि फ्रीडम पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) बोलत होते. ई-फ्लॅगद्वारे मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास  केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत,  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर दयाशंकर तिवारी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंह पुरी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच  खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार ॲड. आशिष जयस्वाल, ॲड. अभिजित वंजारी, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, राजू पारवे, विकास कुंभारे अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी आर. विमला, महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, केंद्रीय सचिव श्री. दुर्गाप्रसाद मिश्रा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

प्रगती आणि विकासासाठी राज्यात मेट्रो, महामार्गांचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रोची ही कामे उन्नत मार्गाने पुढे नेत आहोत. त्या मार्गाखालचा भागही प्रकल्पाचा भाग समजून त्याचा विकास करावा, त्याचे सौंदर्यीकरण करून नागरिकांसाठी तिथे सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबत महामेट्रोने विचार करण्याची सूचना यावेळी  मुख्यमंत्र्यांनी केली.

 

महामेट्रोने नागपूरचा कायापालट केला आहे. मेट्रोचे कालबद्धतेने काम पूर्ण केले आहे, असे सांगून विकास कामे करताना राजकीय मर्यादा दूर ठेवण्याचा पायंडा नागपूरने पाडला असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.

 

नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर घालणाऱ्या महामेट्रोच्या या सेक्शनचे सद्भावना दिवशी लोकार्पण व्हावे हे चांगले औचित्य आहे. फ्रीडम पार्कच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेची गाथा प्रेरणा देत राहील. वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. पालकमंत्री म्हणून विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे डॉ. नितीन राऊत यांनी आश्वस्त केले.

नागपूर मेट्रोच्या सर्वात व्यस्त आणि महत्त्वपूर्ण भागातील या वाहतूक व्यवस्थेमुळे सुमारे एक लाख प्रवाशी मेट्रोशी जोडले जातील. रस्त्यांवरून देशाची ओळख होत असल्याचे सांगून नगरविकासमंत्री  एकनाथ‍ शिंदे म्हणाले की, कोविडच्या संकट काळातही राज्य शासन विकास कामांना चालना देत आहे. विदर्भ-मराठवाड्यासह मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी सांगितले.

 

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नागपूर महामेट्रोचा हा प्रकल्प हा पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले. या प्रकल्पाची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी’ अंमलात आणली आहे. आवाज आणि कंपन कमी होण्यास त्यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.

 

सिताबर्डी-झीरो माईल फ्रीडम पार्क-कस्तुरचंद पार्क सेक्शनचे काम हे सर्वात अभिनव आणि अद्वितीय फ्रेंच वास्तूशास्त्रज्ञाने बांधलेले स्थापत्याचे उत्तम शिल्प असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वीस मजली इमारत असलेले आणि चौथ्या मजल्यावरुन मेट्रो धावणारे हे नाविन्यपूर्ण राजपूत वास्तूकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कॉटन मार्केटपासून सायन्स कॉलेजपर्यंत प्रवासी वाहतूक सुलभ व्हावी यासाठी अंडरपास रस्ता करण्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोचे हे स्टेशन आणखी आकर्षक होण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. महामेट्रोच्या कामासाठी तत्कालीन शासनाने निधी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस व मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित यांचा विशेष उल्लेख केला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले. तेलंगखेडी-फुटाळा येथील महामेट्रोतर्फे करण्यात येत असलेले संगीत कारंजाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे  करण्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. विकासकामांना कायम सहकार्य ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक झीरो माईलला फ्रीडमपार्क व वीस मजली मेट्रोच्या इमारतीमुळे भव्यता येणार असल्याचे सांगितले. महामेट्रोने देशात वेगाने काम केले असल्याची प्रशंसाही त्यांनी केली.

 

सुरुवातीला या विषयीची संपूर्ण माहिती देणाऱ्या दृकश्राव्य फितीचे सादरीकरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या नवीन मार्गावरील प्रवासी सेवेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे संचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार ब्रिजेश दीक्षित यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *