एकजुटीच्या भावनेने कोरोनाचा सामना करु; नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस : पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
Summary
नाशिक, दि. 15 – नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]
नाशिक, दि. 15 – नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे.
नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीकारक, स्वातंत्रसैनिकांनी जसे देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करुन स्वरुन स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांना एकजूट व ऐक्यातून देशाला राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त संकल्प करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सर्व नागरिकांना केले आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल अशा पध्दतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.
सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोरानाकाळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देवून नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्व सुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात आणले असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.
कोरानासारख्या संकटकाळात कुणाचीही उपासमार होवू नये यासाठी अन्न्, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2021 पासून गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
आज स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरु करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीक कर्ज, पीक विमा अशा योजनांचा लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे स्वत: पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविता येणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा व खाते उतारा थेट वेब पोर्टलवरून ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधा महसूल प्रशासनाने विकसित केली आहे. तसेच ई-फेरफार प्रणालीमध्ये अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबित संख्या कमी करण्याच्या कामात नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 1 हजार 341 अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.
कोरोना काळात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 24 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मंजुर करण्यात आले आहे. संगोपन योजनेंतर्गत एकूण 531 बालकांना दरमहा अकराशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याद्वारे 100 सेवा देणारा नाशिक हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
माझी वसुंधरा अभियांनांतर्गत विभाग, जिल्हा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या चारही गटात नाशिक जिल्ह्यासह विभागाची कामगिरी राज्यात उत्कृष्ट राहिली आहे. नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांनी सुरु केलेल्या गुन्हेगार सुधार योजनामुळे गुन्हेगारांना रोजगारासोबत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग मिळणार आहे असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशभरातील पोलिस दलात उत्कृष्ट अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांना पदक जाहिर झाले असल्याने व नाशिक जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केल्यामुळे पालकमंत्री यांनी यावेळी अभिनंदन यावेळी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते विविध पुरस्कार विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे:
पुरस्कार:
देशातील सीमारेषेवर लष्करी कार्यवाही करतांना सन-२०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला चालु असतांना बडगाव जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असतांना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी हेलिकॉप्टर क्रॅश झालेमुळे स्क्वाड्रण लिडर निनाद अनिल मांडवगणे, रा.नाशिक हे शहीद झाले आहेत. त्यांच्या वीर पत्नी, वीर माता व पिता यांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणेत आली असुन, त्यांचा पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.
०३ मार्च २०१८ रोजी नायक निलेश अहिरे यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मिर येथे कर्तव्यावर असतांना जेंव्हा त्यांची सैन्य तुकडी पेट्रोलिंग करत होती आणि त्यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यांना अपंगत्व आले असुन सबब महाराष्ट्र शासनातर्फे साडे आठ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असुन, पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.
२६ मार्च २०१८ रोजी सकाळी १०:१५ वाजता शिपाई भोकरे रावसाहेब धुडकु यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मिर येथे कर्तव्यावर असतांना अपंगत्व आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असुन, पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.
जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या शासकीय व खासगी रुग्णालय यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये एसएमबीटी महाविद्यालय, नामको हास्पिटल नाशिक, सुपर स्पेशालिस्ट हास्पिटल नाशिक या रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला.
पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी केल्या बद्दल आणि उल्लेखनिय व प्रशंसनीय सेवेबद्यल राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक व पोलिस शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह , सन्मानचिन्ह यावेळी पालकमंत्री यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आहे.
शहर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला गौरव
राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंता साहेबराव पाटील व पोलीस हवालदार संतु शिवनाथ खिंडे यांना गौरविण्यात आले. तसेच पोलीस हवालदार प्रविण कोकाटे, पोहवा, पोलीस हवालदार सगुन साबरे, गुलाब सोनार, संतोष वाणी, बलदेव माधव बोरसे, वसंत धर्माजी पांडव, पोलीस नाईक गणेश निंबाळकर,प्रशांत वालझाडे, मिलींद निकम,भुषणसिंग चंदेल, महिला पोलीस हवालदार प्रिती कातकाडे, सुरेशसिंग परदेशी, पोलीस नाईक गणेश फड यांना सन्मान चिन्ह देवून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला गौरव
पोलीस उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे यांना उत्कृष्ट सेवेबद्यल राष्ट्रपतीचे पोलिस पदक, पोलिस उपनिरिक्षक सुदर्शन सुखदेव आवारी, मिलींद शंकरराव तेलुरे, शेख मोहम्मद नजिम अब्दुल रहेमान, सहायक पोलिस उपनिरिक्षक अंबादास जाडर, पोलीस निरीक्षक मनोज गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक निवृत्ती तुंगार, पोलीस हवालदार सुनिल गीत, चालक संजय उध्दव जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम वेटाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना मुरलीधर हरक, पोलीस हवालदार संजीवकुमार काशी माथुर, पोलीस नाईक साधना खैरनार यांना सन्मान चिन्ह देवून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलिस ॲकेडमी,नाशिकचे पुरस्कार
पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडील प्रशिक्षण शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक २०१९ देऊन सम्मान करण्यात आला आहे. तसेच पशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
सुंदर गाव पुरस्कार
जिल्हा परिषदेमार्फत “आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना” अंतर्गत सन-२०१९-२० व सन-२०२०-२१ जिल्हा व तालुका सुंदर गाव ग्रामपंचायींचे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. त्यात सन 2019-20 मध्ये निफाड तालुक्यातील आहेरगांव, कळवण तालुक्यातील चणकापुर, सिन्नर तालुक्यातील दातली, बागलाण तालुक्यातील टेंभे खालचे, चांदवड तालुक्यातील सोग्रस, इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, येवला तालुक्यातील पाटोदा, दिंडोरी तालुक्यातील जानोरी, नाशिक तालुक्यातील ओढा, मालेगाव तालुक्यातील येसगाव बुद्रुक, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले, देवळा तालुक्यातील रामेश्वर, सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा, नांदगाव तालुक्यातील नागापुर, पेठ तालुक्यातील तोंडवळ यांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.
सन 2020-21 मधील निफाड तालुक्यातील ओझर, कळवण तालुक्यातील मेहदर, सिन्नर तालुक्यातील चिंचोली, बागलाण तालुक्यातील नवे निरपुर, चांदवड नन्हावे, इगतपुरी तालुक्यातील नागोसली, येवला तालुक्यातील एरंडगाव खु, दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव, नाशिक तालुक्यातील कोटमगाव, मालेगाव तालुक्यातील बेळगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, देवळा तालुक्यातील माळवाडी, सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, नादगाव तालुक्यातील भालुर, पेठ तालुक्यातील बोरवड यांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव
प्रथम क्रमांक: बागलाण
द्वितीय क्रमांक: देवळा,
तृतीय क्रमांक: त्र्यंबकेश्वर
सर्वोत्कृष्ट क्लस्टर(आवास योजना)
प्रथम क्रमांक: गिरणारे क्लस्टर तालुका नाशिक
द्वितीय क्रमांक: साकोरे क्लस्टर तालुका नांदगाव,
तृतीय क्रमांक :क्लस्टर वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना)
प्रथम क्रमांक: दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत देवपाडा,
द्वितीय क्रमांक: मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवे,
तृतीय क्रमांक: बागलाण तालुक्यातील शेवरे ग्रामपंचायत
आवास योजनेतंर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था
प्रथम क्रमांक: येवला तालुक्यातील जनता नागरी सहकारी बँक
द्वितीय क्रमांक: बागलाण तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, सटाणा शाखा
तृतीय क्रमांक :आडीबीआय बँक, सटाणा
राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार
सर्वोत्कृष्ट तालुके (आवास योजना)
प्रथम क्रमांक: सिन्नर ,
व्दितीय क्रमांक: नांदगाव तालुका,
तृतीय क्रमांक: मालेगाव तालुका
सर्वोत्कृष्ट क्लस्टर(आवास योजना)
प्रथम क्रमांक: येवला तालुक्यातील क्लस्टर राजापुर,
व्दितीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील क्लस्टर नांदगाव सदो,
तृतीय क्रमांक: त्रंबकेश्वर तालुक्यातील क्लस्टर अंजनेरी
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत(आवास योजना)
प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत जामोठी,
व्दितीय क्रमांक: येवला तालुक्यातील ग्रामपंचायत अंगुळगाव,
तृतीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्ली
आवास योजनेतंर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था
प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडीया, सटाणा,
व्दितीय क्रमांक: नाशिक मधील गुरुकृपा महिला स्वंयसहाय्यता, नाशिक समुह, साडगाव,
तृतीय क्रमांक: येवला तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, शाखा पाटोदा
जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख,नाशिक:- “स्वामित्व ” योजने अंतर्गत ड्रोनदारे गावठाण भूमापन करुन तयार करण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेचे वाटप शिवाजी तुपे, योगेश तुपे, रामदास डावरे, आनंद तुपे, राजूबाई सयाजी तुपे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय बेलू या लाभार्थ्यांना करण्यात आले.